
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अवैध सावकारीतून शेताचा ताबा घेण्याच्या प्रयत्नाला विरोध झाडगाव शिवारातील घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा, झाडगाव शिवारात शेताचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या काही पांढरपेशी व्यक्ती व स्वयंघोषित नेत्यांना ग्रामस्थांकडून विरोध झाल्याची घटना सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अवैध सावकारी व्यवहारातून संबंधित शेताचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगत असून, या घटनेमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवा क्षेत्राशी संबंधित एक व्यक्ती तसेच तालुक्यात स्वतःला नेता म्हणून मिळविणारे काही जण झाडगाव शिवारातील एका शेतावर ताबा घेण्यासाठी गेले होते. यावेळी संबंधित शेतजमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांना मारहाण झाल्याची चर्चा तालुकाभर सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणत्याही पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे, संबंधित शेत नेमके कोणाच्या मालकीचे आहे, त्यावरील वाद न्यायालयात प्रलंबित आहे का, तसेच ताबा घेण्यासाठी न्यायालयाची किंवा महसूल विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील नागरिकांमध्ये “कोणत्याही शेतजमिनीचा ताबा हा केवळ कायदेशीर प्रक्रियेद्वारेच घेतला जावा” अशी चर्चा सुरू असून, स्वतःहून जाऊन ताबा घेण्याचे प्रकार कायदा हातात घेण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव आणून जमीन बळकावण्याचे प्रकार वाढत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.दरम्यान, या घटनेनंतर संबंधितांनी पोलिसांत धाव घेतली नसल्याने नेमके प्रकरण काय, मारहाणीमागचे कारण काय आणि ताबा घेण्यासाठी गेलेले व्यक्ती कोण होते, याबाबत तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
