लेख : इंटरनेट एक मृगजळ

✍🏻राजेंद्र टेकाडे, काटोल

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती धीरुभाई अंबानी यांनी 25 वर्षांपूर्वी स्वप्न होते की, प्रत्येक भारतीयांच्या हातात मोबाईल राहील.तेव्हा हे स्वप्न हास्यास्पद वाटत होते. मात्र आज बघितले तर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झालेली आहे.कारण आधुनिक युगात मानवाने विविध क्षेत्रात प्रगती केलेली आहे.वैज्ञानिक क्रांतीमुळे विविध दालने उभे झाले आहे.इंटनेटमुळे सर्व जग हाताच्या मुठीत असल्याची जाणीव होत आहे.
आजचा तरुण अन्न पाण्याशिवाय जगू शकेल मात्र इंटरनेट पासून जगणे जणूकाही शक्यच नाही असा भास निर्माण झाला आहे.कोरोना संकटात तर इंटनेट वापराचे शिखर गाठले आहे.ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल पडला आहे.या मोबाईलचा वापर कसा करायचा ? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.कारण बंदुकीचा वापर सुरक्षेकरिता व मारण्याकरीता दोन कारणासाठी होतो, तसेच इंटरनेट बाबत आहे.
मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब यामुळे विद्यार्थ्यांना ‘स्क्रिनिंग टाईम’ प्रचंड प्रमाणात वाढला आहे.यामुळे डोळ्याचे विकार व मेंदूचे आजार ६ ते १८ वर्ष वयोगटातील २४ टक्के विद्यार्थ्यांत वाढल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांजवळ सतत मोबाईल असतो.त्यात तासनतास विद्यार्थी मोबाईल गेम खेळत असतात.अलीकडे छोट्या मुलांचे व्हाट्सअप्प – टेलिग्राम ग्रुप तयार झालेले असून यावर विद्यार्थी व्हिडीओ कॉलिंग करण्यात व्यस्त राहतात.मोबाईलमुळे मैदानी खेळाचे व विद्यार्थ्यांचे नातं संपुष्टात आले आहे.पालकही पूर्वीसारखा पाल्यांना वेळ देत नाही, त्यामुळे पालकांचा संवाद अंतिम घटका मोजत आहे.मुलांना पालकापेक्षा मोबाईल जवळचा वाटतो.जीवनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘गुगल’ वर शोधण्याचा प्रयत्न केला जातो.आईची माया व वडिलांचा आधार इंटनेटवर मिळू शकत नाही हे विद्यार्थ्यांना कोण पटवून देणार ?
इंटरनेटच्या मृगजळात विद्यार्थी गुरफटून जात आहे.गेम खेळणे, यु ट्यूब वरील व्हिडीओ बघणे, वेगवेगळ्या ऍप्स वापरणे, पोर्न साईटचा वापर करणे यामुळे विद्यार्थी एकलकोंडे बनत आहे.यामुळे भावनिक नाते भविष्यात टिकेल का ? या यक्षप्रश्न उभा राहत आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरावर निर्बंध लादणे मूर्खपणाचे ठरेल.इंटरनेट वापरणे मूलभूत गरज झालेली आहे.मात्र इंटरनेटचा अतिवापर हा भविष्यकालीन पिढी संकटात ढकलण्याचे मुख्य कारण ठरेल.मोबाईलचा अतिवापरामुळे विद्यार्थी एकाच ठिकाणी बसतो, शारीरिक हालचाली होत नाही त्यामुळे स्थूलता वाढते,मानसिकरित्या विद्यार्थी पंगु बनू शकतो. पॅब्जी सारख्या मोबाईल गेममुळे काही विद्यार्थ्यांना मृत्यूने कवटाळले आहे.
शेवटी सर्व पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना मोबाईल नक्की द्या.कारण ती काळाची गरज आहे.मात्र ‘स्क्रिनिंग टाईम’ आपण ठरवून द्या.विद्यार्थ्यांचे अधूनमधून मोबाईल तपासत रहा.विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढवा.आपले पाल्य उद्याचे भावी नागरिक आहे.यांना शारीरिक, भावनिक,मानसिक व नैतिक दृष्ट्या सक्षम बनविणे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे
.

  • राजेंद्र विमल रामहरी टेकाडे
    शिक्षण अभ्यासक
    काटोल जि.नागपूर
    संपर्क : 9145779050