जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी ६७.१५ टक्के मतदान, उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष


नंदुरबार : जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या पोट निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान झाले. राजकीय नेत्यांच्या कुटुंबातीलच सर्वाधिक उमेदवार असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत साधारण ६७.१५ टक्के मतदान झाले होते.
जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी ३६ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान, कोराई गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार माघारी अंती बिनविरोध झाल्यात जमा आहेत. त्यामुळे मतदानाच्या माध्यमातून ८७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. बुधवारी (ता.६) लागलीच मतमोजणी होऊन उमेदवारांचा फैसला जाहीर होणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेचे ११ व पंचायत समितीच्या १४ उमेदवारांचे पद धोक्यात आले होते. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र होते. मात्र महाविकास आघाडी न करता आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या जागा लढविल्या. काही जागांवर समझोता झाला. या निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. सुप्रिया गावित या कोळदा गटातून तर आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी या खापर गटातून निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र ॲड. राम रघुवंशी पुन्हा कोपर्ली गटातून निवडणुकीत आहेत.
त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तिन्ही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज ४५६ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाचा वेळी तिन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या मतदारसंघात विशेष लक्ष देऊन होते. सकाळी साडेसातपासूनच नेते मंडळी मतदार संघात फिरत होते. जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी कार्यकर्त्यांकरवी प्रयत्न करत होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी कोळदा, खोंडामळी, भागसरी येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील नियोजनाची पाहणी केली. सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक होता. कुठेही वाद विवाद न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बुधवारच्या (ता.६) मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. नंदुरबार तालुक्यासाठी वखार महामंडळाच्या वेअर हाऊसमध्ये तर शहादा व अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
मतदान व उमेदवारांची चुरस पहाता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.