युद्धामुळे कोणत्याही देशाचा फायदा होत नाही – डॉ.प्रा.मंगेश आचार्य

रशिया मुत्सदेगिरीत जगात सर्वात पुढे- डॉ. मंगेश आचार्य

‘युक्रेन राशिया युद्धाचे जागतिक परिणाम’ या विषयावर व्याख्यान

जि. प. स्पर्धा परीक्षा गअभ्यास केंद्र, काटोल येथील ग्रेट भेट उपक्रम

तालुका प्रतिनिधी / १९ मे

काटोल – युद्धामुळे कोणत्याही देशाचे भले होत नाही त्यामुळे युद्ध न होणे सर्वात उत्तम उपाय आहे. नाटोच्या सभासदत्वावरून युक्रेन व रशिया युद्ध मागील ८५ दिवसापासून सुरू आहे. १९९१ ला रशियाचे विघटन होऊन १५ देशांची निर्मिती झाली. तेव्हापासून रशियाच्या मनात खदखद आहे.रशिया मुत्सदेगिरीत जगात सर्वात पुढे आहे. जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करण्याकरिता विदेशी निती ठरवितांना भावनेपेक्षा व्यावहारिकता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जीवनविकास महाविद्यालय, देवग्राम येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रा.मंगेश आचार्य यांनी केले.
जि.प. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे ‘ग्रेट भेट’ उपक्रमांतर्गत ‘रशिया व युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम’ या विषयावर डॉ.प्रा.मंगेश आचार्य यांनी व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे आचार्य म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत युक्रेन रशिया युध्दाच्या मतदान प्रक्रीयेत भारतात घेतलेली ‘तटस्थ’ भूमिका योग्य होती. रशियाने भारताला वेळोवेळी मदत केलेली आहे. या युद्धामुळे रूपयाचे अवमुल्यन झाले. महागाईचा भड़का वाढीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कच्चा तेल्याचे किंमत वाढल्यामुळे आर्थिक संकट निर्माण होत आहे.
यावेळी महाराष्ट्र दिनाला घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनुक्रमे तीन ठरलेले गौरव उमप, गौरव गाढवे व स्वर्णा कोटजावळे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सोनटक्के, संचालन स्वर्णा कोटजावळे तर आभार प्रदर्शन नोमादेवी खुरपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर व सुरक्षा रक्षक प्रल्हाद पडोळे यांनी सहकार्य केले.