

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात यंदाच्या पावसाचा अंदाज चुकल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भविष्याची चिंता लागली होती. अशा परिस्थितीत झालेल्या अतिवृष्टीने शेतीची नासाडी अन् घरांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीमुळे सर्वसामान्य नुकसानग्रस्तांचा जीव टांगणीला लागला आहे.सातत्याने नैसर्गिक संकटे पेलणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाची तयारी केली होती. यावर्षी भरपूर पाऊस होईल असा अंदाज सुरुवातीपासूनच वर्तविण्यात येत होता. मात्र ऐन पेरणीच्या काळात पाऊस पडला नाही तरी, काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तर काहींनी अल्पशा पावसावर खरिपाची पेरणी उरकली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उभे टाकले होते. दरम्यान जुलैच्या दुसऱ्या सप्ताहात सुरू झालेल्या पावसाने सर्वांचे अंदाज चुकवित अतिवृष्टीचा कहर केला. राळेगाव तालुक्यात सर्वात जास्त सरासरी पेक्षा पर्जन्यमाना अधिक यंदाच्या हंगामात पावसाची नोंद झाली आहे.
यामुळे कोरडी पडलेली नदी, नाले व वोढे ओसंडून वाहून शेतात नुकतेच उगवलेले उभे पीक शेत जमिनीसह खरडून गेले. शेतात, घरादारात आणि रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
या अतिवृष्टीने प्राथमिक अंदाजानुसार रिधोरा सह परिसरातील हजारो हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले असावे. त्या सोबतच रिधोरा सह परिसरातील जवळपास पाचशे ते सहाशे घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाल्याचा अंदाज आहे. शेतीसह घरांचे असे दुहेरी नुकसान झालेल्यांने संसार उघड्यावर पडले आहेत. यातून सावरण्यासाठी आता नुकसानग्रस्तांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या असल्या तरी सरसकट नुकसान भरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
मातीच्या घरात वास्तव्य करणारे परिवार दहशतीत आहे
मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील मातीची घरे पडण्याच्या मार्गावर आहे. मातीच्या भितीत -मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने त्या भिंती जमिनदोस्त होत आहे. परिणामी मातीच्या घरात वास्तव्य करणारे परिवार दहशतीत दिवस काढत असल्याचे चित्र निदर्शनास येते आहे.
निसर्गाने मारले, शासनाने तारावे
अतिवृष्टी आणि पुराने रिधोरा सह परिसरातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे तातडीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, ही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे पीक वाहून गेले. तर महागडे बियाणे व रासायनिक खते खरेदी करून लागवड केलेले सोयाबीन व तुरीचे पिकही पाण्यात विरले. त्यामुळे लागवड खर्चही भरून निघणे कठीण असून वाढत्या महागाईच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी वर्षभर कुटुंबाचा खर्च कसा भागणार ? या चिंतेने ग्रासला असुन आता उत्पन्न तर दुरच,लागवडीचा खर्च निघण्याचीही आशा उरली नसल्याने आता शेतकरी, शेतमजूर यांना शासन मदत करणार की पाने पुसणार ? असे शेतकरी, शेतमजूर यांच्या कडून बोलल्या जात आहे.
