विडूळात रंगली तान्हा पोळ्याची मैफिल

प्रतिनिधी
प्रवीण जोशी, ढाणकी


भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलांचे सुद्धा योगदान असते. त्यामुळे या बैलांची भारत देशात पूजा केली जाते. पोळा हा सण त्यापैकीच एक आहे, या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात.
विदर्भात पोळ्याचा सण उत्साहाच्या वातावरणात व मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो. विदर्भात अनेक ठिकाणी बैलपोळा या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे तान्हा पोळा सण. हा सण म्हणजे बालगोपाळांचा सण असतो. कारण लहान मुले मोठे बैल कुठे नेऊ शकत नाही किंवा व्यवस्थित सांभाळू शकत नाही. बैलांना आवरणे त्यांना कठीण जाते. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. लहान मुले लाकडापासून किंवा मातीपासून तयार केलेला लहान बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या कहराणे जणू साऱ्याच सणांचा आनंद हिसकावून घेतलेला होता. कोणत्याच गोष्टीत काही करता आले नाही. मात्र तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज पोळ्याचा सण चांगल्या प्रकारे रंगला. लहान मुलांचे पोशाख, शेतकरी राज्याची घेतलेली वेशभूषा सारखं काही मोहून टाकणार चित्र आज विडूळ या गावातील तान्हा पोळ्यात दिसले. यावेळी आनंद साजरा करताना गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतिशील शेतकरी सौरभराव देशमुख व गावातील सर्व नागरिकांनी उपस्थिती लावलेली होती.