
प्रतिनिधी :कृष्णा चौतमाल ,हदगाव
निवघा – पासून जवळच असलेल्या कोळी येथे मोकाट डुकराने धुमाकूळ घातला असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उकिरडे,गटारी कमी झाल्याने पाळीव डुकरांनी गावठाण सोडून थेट शिवार गाठले.खायचे कमी पण नुकसान जादा करायचे,अशी त्यांची खाद्यशैली. बदलत्या ग्रामसंस्कृतीतून नवे प्रश्न निर्माण झाले असून त्यांचा मुकाबला करताना ते त्रस्त झाले आहेत.
आता गावगाडय़ात मोठे बदल होत आहेत. एक तर गावात राहणारे शेतकरी हे शिवारात राहू लागले. त्याने गावातील उकिरडे कमी झाले. ग्रामपंचायतीना थेट निधी मिळू लागला, त्याने गटारी बंदीस्त झाल्या, ग्रामस्वच्छता अभियान सुरु झाले. ग्रामसंस्कृतीतील झालेल्या बदलाने डुकराच्या खाद्यावर गदा आली अन त्यांनी शेतशिवाराचा रस्ता धरला.
ग्रामस्वच्छता व हगणदारीमुक्त अभियान सुरु झाल्यानंतर गावोगाव उघडय़ा गटारी जशा बंद झाल्या तसेच रस्त्याच्या कडेला असलेले उकिरडे टाकू नका असे पदाधिकार्यानी सांगितले. आता ते खासगी जागेत टाकले जातात. रस्त्याच्या कडेने ते दिसेनासे झाले. गावातील सरपंचापासून ते शिपायापर्यंत सारेजण डुकर पाळू नका, पाळल्यास दंड केला जाईल, घरकुल तसेच अन्य सवलतींचा लाभ दिला जाणार नाही असे सांगतात. त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडून दिला. मात्र त्यांच्याकडील पाळीव डुकरे शिवारात गेली. पूर्वी त्यांचे मालक ही डुकरे पकडून आणत. पण आता त्यांना ती सापडत नाहीत. नुकसानीची भरपाई काही शेतकरी मागतात. त्यामुळे वादापेक्षा त्यांनी आपले डुकरे नाहीत असे सांगुन वेळ मारुन नेतात.
पाळीव व गावठी डुकरांच्या त्रासाबद्दल शेतकरी तक्रारी करीत असल्याने लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष वेधले. विधानसभेतही त्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्यातील काही आमदारांनी वनखात्याला या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. पण वनखात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तसेच अनेक गावांत बिबटे आल्यानंतर लोक तक्रारी करतात. त्यांना िपजरे लावून पकडून अन्यत्र सोडून देण्याकडे त्यांची ताकद खर्च होते. आत्तापर्यंत जिल्ह्यात पिकांचे नुकसान रानडुकरांनी की, गावठी डुकरांनी केले याचा निष्कर्षही वनखाते काढू शकलेले नाही. डुकरे पकडण्यासाठी शिकार करणाऱ्यांना पसे द्यावे लागतात. एक डुकरामागे एक हजार रुपये घेतले जातात. त्यात रानडुकर सापडले तर कारवाई होण्याचा धोका असतो. त्यामुळे भिक नको पण कुत्रे आवर या उक्तीप्रमाणे शेतकरी हे डुकरे मारण्याचे टाळतात.
शहरात पालिका डुकरे पकडण्यासाठी खासगी लोकांना ठेका देते. पण ग्रामपंचायतीकडे मात्र अशा प्रकारची तरतूद नाही. एक तर पंचायतींना अशा कामासाठी निधी नसतो. आणि मनुष्यबळही नसते.
पाळीव डुकरे मारण्यास परवानगी लागत नाही. मोकाट गावठी डुक्कर हे उपद्रवी म्हणून जाहीर केले आहे.मात्र रानडुकरे मारण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली जाते पण आता रानडुकरे नव्हे तर मोकाट गावठी डुकराचा त्रास काही भागात वाढला आहे