पीकविम्याचे पैसे त्वरित द्या हो,वंचित शेतकऱ्यांचा टाहो; नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

अतिवृष्टीने तालुक्यात सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला, त्यातील काही शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला. पण त्याची मदत अजूनपर्यंत न मिळाल्याने पिकविम्याचे पैसे द्या हो, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यात अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींचे शेत खरडून गेले तर काहींचे पीक वाहून गेले. काहींना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. एकंदरीत शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यातील काही शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला. पीकविमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी काही महिन्यांपूर्वी विमा प्रतिनिधी राळेगाव येथे घेऊन आला. त्याने शेताची प्रत्यक्ष पाहणी केली. काही अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतले तसेच काही कागदपत्रेसुद्धा घेतली व लवकरच नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले. पण आज महिना उलटुनही ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. नुकसान झाले हे विमा कंपनीने मान्य केले. त्यासाठीची आवश्यक कार्यवाहीही झाली. मग नुकसानभरपाईची रक्कम देण्यात कंपनी इतका विलंब का लावत आहे, याचे कोडे शेतकऱ्यांना सोडवत नाही. नुकतेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आयुक्तांची बैठक घेऊन त्यात पाच दिवसांत नुकसानीचे क्लेम निकाली काढा व आठ दिवसात नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, असे निर्देश विभागीय आयुक्त व कंपन्यांना दिले. तरी आजतागायत नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. कंपनीने क्लेम मान्य केल्यावर नुकसानभरपाईची रक्कम ही महिन्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे, असाही नियम आहे. पण आता महिना उलटूनही नुकसानभरपाईची रक्कम जमा न झाल्याने ती तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरीवर्गांतून होत आहे.