वेळेचे व्यवस्थापन करा, मोबाईल सक्तीने टाळा
एम एस सी (गणित) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रणवने दिल्या टिप्स


प्रतिनिधी::यवतमाळ
प्रविण जोशी


महागांव, ता. १२ : एम एस सी गणित
होण्यासाठीचा प्रवास अतिशय खडतर असला तरी या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्यावा. अगदी एम एस सी गणित परीक्षेची तयारी करताना
वेळेचे व्यवस्थापन किती कुशलतेने करतो, त्यावर आपले यश अवलंबून आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या
कालावधीत मोबाईलचा वापर सक्तीने टाळावा, असा सल्ला नुकताच एम एस सी (गणित) परीक्षेत यश प्राप्त केलेल्या प्रणव प्रकाश चिद्दवार ह्याने विद्यार्थ्यांना दिला. तालुक्यातील मुद्रांक विक्रेता असलेले प्रकाश चिद्दवार यांचा मुलगा प्रणव प्रकाश चिद्दवार याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील एम एस सी अभ्यासक्रमात गणित या विषयामध्ये ९३.२८% घेऊन विद्यापीठातून तिसरा क्रमांक पटकावुन घवघवीत यश मिळविले. त्याचे मागिल शिक्षण नर्सरी ते दहावी पर्यत मातोश्री विद्यालय महागांव येथे झाले. त्यानंतर अकरावी ते बारावी शिक्षण साईबाबा विद्यालय टेंभी येथे झाले. बी एस सी गणित हा अभ्यासक्रम त्याने यशवंत महाविद्यालय नांदेड येथे पुर्ण केला व एम एस सी गणित अभ्यासक्रम सायन्स महाविद्यालय नांदेड येथुन पुर्ण केला. त्यानंतर प्रणवने आय टी अभ्यासक्रम दिल्ली येथे पुर्ण केला आणि पी एच डी पुर्व परीक्षा तो पात्र झाला. प्रणवने यशाचे श्रेय आई रजनी प्रकाश चिद्दरवार, वडील व गुरुजन वर्ग यांना दिले. त्याला मिळालेल्या यशामुळे जयकुमार वानखेडे, मुख्याध्यापक, टी. जी. देशमुख माध्यमिक आश्रम शाळा, आमणी (बु), रवि भांगे, गजानन भारती, दिनेश भंडारी, शंकर आडे, अजय शिरमवार, विलास भास्करवार, अतुल उके यांच्याकडून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. त्यावेळी प्रणव म्हणाला, अभ्यास सुरू केल्यापासून मोबाईल वापरत नव्हता. अभ्यास करताना स्वतःच्या फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. अगदी परीक्षा कालावधीतही व्यायामात सातत्य राखले. बरेच विद्यार्थी जास्तीत जास्त तास अभ्यास करण्यावर भर देतात. परंतु व्यायाम व पुरेशी झोप महत्त्वाची ठरते. मित्र, कुटुंबातील सदस्यांकडून नेहमीच मिळणारे प्रोत्साहन आपल्या यशाच्या वाटेत मोलाची भूमिका बजावतात. जसे परीक्षेपूर्वी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, तसेच परीक्षा केंद्रातही डोकं शांत ठेवून प्रश्न सोडविणे आवश्यक ठरते. भांबावून न जाता, शांतचित्ताने प्रश्न सोडवावे. संपूर्ण पेपर सोडविण्यावर आपला भर असावा. असे सांगताना या शिक्षणक्रमाची तयारी करणाऱ्यांसाठी प्रणवने टिप्स दिल्या.

……चौकट…..

मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी : प्रणव एम एस सी (गणित) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रणव याने विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या. प्रणव म्हणाला, की केवळ क्लासचे नोटिफिकेशन व शिक्षणक्रमाच्या पीडीएफ फाइल पाहण्यासाठी मोबाईलचा वापर केला.

……चौकट…..

नियमित अभ्यास महत्त्वाचा

प्रणव म्हणाला, की केवळ परीक्षेच्या पूर्वी काही कालावधीत झपाटून अभ्यास करण्यापेक्षा नियमितपणे अभ्यास केल्यास भार येत नाही. अभ्यासक्रमाची व्याप्ती खूप मोठी असते. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवत व वेळोवेळी उजळणी करून दडपण कमी करता येऊ शकते.