विजेची तार तुटल्याने रेल्वे गाड्या उशिरा ,नवी दिल्ली-चेन्नई मार्गावरील अनेक गाड्यां खोळंबल्या

वरोरा, २५ एप्रिल नवी दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावर वरोरा नजीक मंगळवार, २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका रेल्वेगाडीच्या आकड्यामुळे विजेची तार तुटली. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आणि पुढच्या काही गाड्या वेळेवर धावू शकल्या नाही.मंगळवारी दुपारी 3 वाजतादरम्यान पटना एक्सप्रेस ही गाडी ‘डाऊनलाईन’ने जात असताना वरोडा नजीक बोर्डा रेल्वे पुलाजवळ रेल्वे इंजिनच्या वर असलेल्या आकड्यामुळे वीज प्रवाह देणारी तारच तुटली. पटना एक्सप्रेस पुढे निघून गेल्यानंतर ही घटना तत्काळ वरोरा ‘कंट्रोल रूम’ला कळविण्यात आली आणि ‘डाऊनलाईन’वरील दानापूर
सिकंदराबाद (१२७९२), अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेस (१२६५५), नवजीवन एक्सप्रेस, तामिळनाडू एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस यासह सर्व गाड्या एका पाठोपाठ एक वरोरा रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या. जवळपास तीन तास त्या थांबून होत्या. ही माहिती वर्धा येथील वरिष्ठ विभागीय अभियंता कार्यालयाला देण्यात आली आणि आर. एन. चौधरी यांच्या नेतृत्वात एक चमू तत्काळ विजेची तार दुरुस्त करण्याकरिता दाखल झाली.
यासंदर्भात नागपूर येथील डीसीएम चंद्रकांत पगारे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, विद्युत तारेत काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ती तुटली. याचा परिणाम मागावून येणाऱ्या सर्व ‘डाऊनलाईन’ गाड्यांवर झाला आणि सर्व गाड्या या उशिराने धावल्या. ही अडचण दूर करता यावी म्हणून ‘डाऊनलाईन’च्या गाड्या अपलाईन’ने काढणे सुरू असून, ‘अपलाईन’च्या गाड्यांनासुद्धा उशीर होण्याची शक्यता आहे.