
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मोहदा येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोहदा येथील हनुमान वॉर्ड परिसरातील सुखदेव दोनाडकर हे एका लग्न समारंभासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत होते. नेहमीप्रमाणे सकाळी ते शेतावर गेले होते. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास ते घरी परतले आणि घराला कुलूप लावून लग्नासाठी रवाना झाले.
दरम्यान, दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांची आई घराची पाहणी करण्यासाठी आली असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता कपाटात ठेवलेली सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे समोर आले.घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील पीयूष गबराणी यांना देण्यात आली. त्यांनी वेळ न दवडता संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.चोरीचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 331(3) आणि 305(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डीवायएसपी रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार लहुजी तावडे, तपास अधिकारी रमाकांत खंदारे, नितीन सुशीर, विलास जाधव, सचिन काकडे, सुनील राठोड आणि निकेलेश चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
ही चोरी पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घरातील हालचालींची माहिती असलेल्या व्यक्तीचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच चोरीमागील सत्य समोर येणार आहे.भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे मोहदा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे आरोपींना तात्काळ अटक करून चोरीचा छडा लावण्याची मागणी केली आहे.
