

प्रतिनिधी:: विजय वाडेकर.
गांजेगाव.
प्रत्येक गाव खेड्यात रस्ते व्यवस्थित असतील तर विकासाची गती अधिक प्रमाणात होऊन शैक्षणिक, वैद्यकीय, यंत्रणा वेळेवर पोहोचून अनेक होणाऱ्या भविष्यातील दुर्घटना टळतात म्हणूनच रस्ते ग्रामीण स्तरावरील प्रमुख मुद्दा ठरतो व त्याला अनुसरून लोकप्रतिनिधी सुद्धा त्या सर्वसामान्यांना मान्य असलेल्या मुद्द्याला हात घालून राजकारण करीत असतात असाच प्रत्येय सध्या गांजेगावकरांना येतो आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या भागाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुरव्याने हा रस्ता मंजूर होऊन शासकीय प्रक्रियेनुसार निविदा प्रक्रिया सोहळा पार पडला. आणि ७८७::९५ लक्ष एवढा निधी प्राप्त सुद्धा झाला पण सर्वसामान्यां च्या अपेक्षेला तिलांजली वाहण्याचे काम ठेकेदार करीत आहे. मागील सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अक्षरशः नाकी नऊ आले. गांजेगाव येथे जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आणि ढाणकी शहरात येऊन काम करून उदर निर्वाह करणारी मंडळी आहे. पण मागील आठवड्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ढाणकीला येण्यासाठी अनेकांना दुचाकी असून सुद्धा येता आले नाही व ज्यांनी येण्याचा प्रयत्न केला त्यांना चिखलाच्या साम्राज्याला सामोरे जावे लागले दुचाकी वाहनाच्या मडगर मध्ये साईट पट्ट्या भरताना टाकलेल्या काळया मातीचे गोळे बसले आणि अनेकांना आपल्या दुचाकी जागेवर ठेवून मडगर मधील अटकलेले गोळे काढूनच पुढील वाटचाल करता आली
०३/०३/२०२३ पर्यंत काम पूर्ण होण्याची मुदत असताना आतापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही यावरून प्रशासन “तुम मिले हम मिले हर कदम मिलके चले” अशा भूमिकेत आहे का?? मुदत संपून सुद्धा वारंवार कामाची मुदत वाढून मिळत आहे. त्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधी ठेकेदाराच्या दावणीला व त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊन काही अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केले का?? हा सुद्धा प्रश्न सर्व सामान्यांना पडतो आहे. याच मार्गावर अनेक ठिकानी लहान-मोठे नाले असून दुचाकी व चारचाकी वाहनांना त्रास होऊ नये म्हणून पुलाचे बांधकाम चालू आहे पण ते सुद्धा अत्यंत संथ गतीने चालू असून त्यात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता सुद्धा संशयास्पद आहे अशी जनचर्चा आहे.येत्या काही दिवसात अनेक मुला मुलींचे शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल पण आजतागायत हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही आणि पूर्ण होईल की नाही हा येणारा काळच ठरवेल पण निसर्ग राजा सुद्धा कदरदान म्हणावा लागेल की पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण नाही झाले तर भविष्यात काय गोंधळ होऊ शकते हे बेमोसमी पाण्याने दाखवून दिले. तसेच अनेकांच्या मागणीनंतर गुण नियंत्रण पथकाने पाहणी केली पण नेहमीप्रमाणेच नापास किंवा ढकल पास न करता पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण झाल्याचे बक्षीस घेऊन देऊन आपला कार्यभाग पार पडला का?? किंव्हा टक्केवारी मध्ये सगळी यंत्रणा गुंतली का?? अशा अनेक शंका सर्वसामान्य गावकऱ्यांना पडत आहे. रेल्वे मार्ग असल्याने हिमायतनगर येथे ढाणकी परिसरातील अनेक जण रेल्वेचा उपयोग करण्यासाठी याच मार्गाचा वापर करत असतात तसेच पावसाळ्यात विद्यार्थी रुग्ण विशेष म्हणजे गरोदर माता भगिनीचे प्रचंड प्रमाणात हाल होणार असून शक्य तितक्या लवकर हा रस्ता व्हावा अशी सर्वसामान्य गांजेगाव येथील जनतेला वाटत आहे
