.

प्रतिनिधी : शेख रमजान बिटरगांव ( बु )
आगामी जिल्हा परिषद, समिती, तदनंतर विधानसभा, लोकसभा निवडणुका अगदी वर्ष- दीड वर्षाच्या फरकावर येऊन ठेपल्या असताना, अनेक स्वयंघोषित व अनेक पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या, मतदारसंघात कोणाच्याही ओळखीचे नसलेल्या, काहींचा तर जन्म जरी इकडला, पण कर्मभूमी इतरत्र मोठमोठे शहर असलेल्या नेत्यांची, निवडणुकांच्या तोंडावरच मतदार संघाकडे धाव. मतदार संघात वेगवेगळ्या सामाजिक समस्या सोडवण्याचे समाजकार्य आणि त्या समाजकार्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून गवगवा, या गोष्टींचं सध्या तरी भरघोस प्रमाणात पेव फुटलेलं पहायला मिळत आहे.
मग मतदारसंघातील मर्जीतले दोन-चार कार्यकर्ते घेऊन, मतदार संघाच्या समस्या सोडवण्यासाठीची चढाओढ, ह्यामुळे मात्र नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. मतदार संघातील कुण्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असो, कुण्या कार्यकर्त्याच्या घरी लग्न असो, कुण्या कार्यकर्त्याकडे दुःखद प्रसंग असो या ठिकाणी या नवीन नेत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आणि फक्त कार्यकर्तेच नाही तर, मतदारसंघात कुणाच्याही घरी सदर कार्यक्रमास तिथं ओळख असो – नसो स्थानिक च्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, त्या ठिकाणी हे नेते आवर्जून भेटी देताना दिसत आहेत.
यामुळे मतदार संघातील सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न असा आहे की, नेमके हे नेते आतापर्यंत कुठे होते? आत्ताच मतदारसंघातल्या अडीअडचणी यांना का दिसत असाव्यात? आणि हे नेते खरंच मतदारसंघातल्या अडचणी सोडवू शकतील का? कारण ज्यांचं अख्खं आयुष्य ते कधी मतदार संघाकडे फिरकलेही नाही, आणि आता निवडणुकांच्या तोंडावर यांना मतदार संघातल्या अडचणी का दिसत असतील? आणि त्या का दिसाव्यात? किंवा हे बाहेरून आलेले उमेदवार जर कोणत्याही पक्षांनी मतदारावर लादले तर, मतदारांनी यांना का बरं निवडून द्यावं? अगदी बंदी भागातील शेवटच्या टोकाचं गाव तरी या नवीन उमेदवारांना माहित आहे का?
आज बंदी भागातील जवराळा, परोटी गावाचा उल्लेख घ्या. त्या गावात रस्ता नाही, एस.टी. महामंडळाची लाल परी सुद्धा त्या गावापर्यंत आजपावेतो पोहोचली नाही.
देश स्वातंत्र्य होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बनवत आहोत आपण. काय बेहाल असतील त्या नागरीकांचे? ह्याची कल्पना करु शकतो आपण. सदर नेत्यांना मतदारसंघातल्या समस्या तर सोडा, अजून पूर्णपणे मतदार संघाची ओळख तरी झाली का ? किंवा यांना तरी कोणी ओळखतो का ? आणि अशा बाहेरील संधीसाधू नेत्यांना, मतदार निवडून तरी देतील का ? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत.
आता इंटरनेटचे जग आहे आणि मतदार हा फक्त नावाला राजा राहीला नसुन आता सुज्ञ झालाय.आता मतदाराशी प्रामाणिक व विकासाचं प्रामाणिक व्हिजन असलेला, स्थानिक,स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असलेला, निडर, तडफदार उमेदवारचं, मतदार निवडणारं ? या चर्चेला उधाण आले आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकीवर, बंदी भाग विकास समिती, पैनगंगा अभयारण्य संघर्ष समिती यांचे मार्फत, बंदी भागातील तब्बल २१ गावांनी बहिष्कार टाकला होता. कारण बंदी व जंगल भागात दळणवळणाची सुविधा आज पावेतो चांगली नसल्याकारणाने, या भागास चांगले रस्ते मिळावे याकरिता या २१ गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. परंतु आज चार वर्ष होऊन अजूनही बंदी भागातील रस्ते झालेले नाहीत. फक्त जेवली ते सोनदाबी रस्ता झालेला असून, इतरत्र ठिकाणी नागरिक राहतात की नाही? हा प्रश्न तेथिल स्थानिक चे नागरिक निर्माण करीत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी व इच्छुक उमेदवार आश्वासन देऊन जातात फक्त. विकास मात्र कागदावरच राहतो. ही सर्वात मोठी खंत असल्याचे एका नागरिकाने नाव न घेण्याचे अटीवर सांगितले.
