
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
मागील वीस बावीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होते मात्र आता मागील काही दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता दूर केली या पावसामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून या दोन दिवसापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांना नवसंजीवनी मिळाली आहे व या पावसामुळे शेतकरी पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला लागला आहे.
शेतकऱ्यांना शेती कामासाठी पाऊस हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो कारण पिकासाठी पावसाची नितांत आवश्यकता असते.. शेतकऱ्यांना दरवर्षी शेतीसाठी योग्य प्रमाणात पावसाची अपेक्षा असते. यावर्षीच्या खरीप हंगामात जून महिन्यात पाऊस अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ढाणकी परिसरासह तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. या जोरदार पावसामुळे तालुक्यात जुलै महिन्यात पूरस्थिती निर्माण होऊन नदी नाल्यांना पूर येऊन अनेक शेतकऱ्यांचे नदी नाल्या काठावरील व इतरही शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या जुलै महिन्यातील पावसाने अनेक शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करणे सुद्धा कठीण झाले होते.
मात्र जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जी पावसाने दडी मारली ती तब्बल २० ते २२ दिवसाची पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने शेतातील पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन ताण येऊ लागल्याने शेत जमिनीला वरखडा पकडला. यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. विशेषतः सोयाबीन हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावरच होते. कारण सोयाबीन हे पीक फुलोऱ्यावर असून या पिकाला पावसाची नितांत गरज होती. पावसामुळे इतर पिके ही कोमेजल्या अवस्थेत गेले होते. तसेच जुलै महिन्यात सलग पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना शेतमशागतीची कामे करण्यास वेळ मिळाला नसल्यामुळे पिकामध्ये तणाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केला होता त्यामुळे शेतजमिनी खूपच कडक आल्या होत्या. तसेच शेतमालावर मावा, चिकटा, कोकडा ह्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव खूप वाढला होता. यामुळे कडक आलेल्या जमिनी व वाढलेला रोगाचा प्रादुर्भाव यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता शेतकऱ्यांना भासत होती.
अचानक पावसाने दडी मारल्याने शेतमालांना पाण्याची आवश्यकता होती . तेव्हा गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होऊन पावसासाठी पोषक असे वातावरणाची निर्मिती झाली होती व अचानक पाऊस शुक्रवार१८ ऑगस्ट पासून येणे चालू होऊन शनिवार १९ ऑगस्ट पासून दिवस रात्र सलग आल्याने खैरी परिसरासह सर्वत्र तालुक्यात आल्याने शेतकरी बांधव हा खूपच सुखावला असून या पावसाने कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र हा पाऊस जर आठ-दहा दिवसा पहिले आला असता तर पिके आणखीही जोमात असती अशी चर्चा शेतकरी बांधव करताना दिसत आहे.
