वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार तर एक कालवड जखमी गाडेगाव शिवारातील घटना

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तर गेल्या दोन ते तीन महिन्यांत १० पेक्षा जास्त जनावरे वाघाने ठार मारली आहेत. या वाढत्या हल्ल्यांमुळे जंगल परिसरातील शेतांमध्ये जाण्यास शेतकरी धजावत आहेत. अनेकांनी तर शेतात जाणेही बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
आदिवासी बहुल राळेगाव तालुक्यातील घनदाट सराटी बोराटी जंगलात वर्षभरापासून वाघाचा वावर वाढला आहे. गेल्या २ महिन्यांत तालुक्यातील सराटी,बोराटी,वेडशी, वारा,किन्ही चाचोरा,आदी गावांतील १० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या गायी, कालवड, वासरू, बकरीची शिकार वाघाने केली आहे. त्यामुळे या गावांतील नागरिक आता दहशतीखाली आहेत. शेतमजूर व नागरिकांनी शिवारातील रस्त्याने जाणे बंद केले आहे.
तालुक्यातील जंगल क्षेत्रात नेमके किती वाघ आहेत, याबाबत संभ्रम आहे.याबाबत वन विभागाला माहिती विचारली असता सांगण्यात आली नाही. मात्र या माहितीतही नेमकेपणा नव्हता,
अशीच एक वाघाच्या हल्याची घटना आज गुरुवार दि ४ जानेवारी रोजी तालुक्यातील गाडेगाव शेतशिवारात घडली.यात वाघाने एका गाईची शिकार तर एक कालवड जखमी केली.
किन्ही जवादे येथील विलास क्षीरसागर यांचे गाडेगाव शिवारात शेत आहे यांची गाय आणि कालवड सकाळच्या सुमारास शेतात चरत असताना अचानक वाघाने हल्ला चढवित यात विलास क्षीरसागर यांची गाय ठार केली व कालवड जखमी केली. नंतर वाघाने आपला मोर्चा किन्ही चाचोरा या शिवाराकडे वळविला, चाचोरा येथील सुरत लेनगुरे ,पंकज गुरनुले हे शेत पिकाला पाणी देण्यासाठी सकाळच्या दरम्यान आपल्या शेतात गेले असता त्यांना वाघाचे दर्शन झाले, ही माहिती त्यांनी लगेच वनविभागाला दिली लगेच विहिरगाव बीटचे वनरक्षक कु. आरती भसारकर,वनपाल एम यू टोंगे यांनी गुरणूले यांच्या शेताची पाहणी केली या पाहणीत वनविभागाच्या टीमला वाघाचे पंजे आढळून आले.तसेच गाडेगाव शिवारात ज्या परिसरात वाघाने गाईला ठार केले त्या परिसरात दोन कॅमेरे लावले असल्याची माहिती वनविभागाने दिली, व घटनास्थळाचा पंचनामा केला.
सध्या आता शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू आहे गहू.हरभरा या पिकाची लागवड केली आहे या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना केव्हाही शेतात जावे लागते आधीच पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात १०,२० रुपये टाकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यात आता वाघाने भर घातली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे, व वाघाच्या हल्ल्यात ठार केलेल्या गाई मालकाकडून नुकसान भरपाई ची मागणी करण्यात आली आहे.

अवनीची पुनरावृत्ती होणार का?

गेल्या काही वर्षापूर्वी राळेगाव तालुक्यात अवनी वाघिणीची दहशत होती. त्या अवनी वाघिणीने १३ लोकांचे जीव घेतले होते. त्यामुळे तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली होती. त्या अवनीला ठार करण्यासाठी वनविभागाला मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागले होते. १३ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर त्या अवनी वाघिणीला वनविभागाच्या टीमने ठार केले होते.तेव्हा कुठे तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.जंगल परिसरात वाघाचा वावर असून अशातच शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन सुद्धा होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत आहे.पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे, अनेक गाई वाघाने ठार केल्या आहे.त्यामुळे पुन्हा तीच अवनीची दहशत तालुक्यात निर्माण होणार का असा सवाल तालुक्यातील नागरिक करीत आहे.