खैरी येथे श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न: खैरी गावात भक्तीमय व आनंदी वातावरण

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे महादेव देवस्थान वारकरी भजन मंडळ व ग्रामवासियांच्या वतीने अखंड हरिनाम व श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ तथा भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचे आयोजन श्री रामनवमीच्या शुभ पर्वावर दिनांक ११ एप्रिल ते १८ एप्रिल २०२४ दरम्यान महादेव देवस्थान प्रांगणात करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप काल्याचे किर्तन व महाप्रसादाने करण्यात आला. या सप्ताह निमित्त खैरी गावात भक्तीमय व आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
या अखंड हरिनाम व श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ तथा भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे कलशस्थापना श्री वसंतराव जवादे यांच्या हस्ते ११ एप्रिल गुरुवार रोजी करण्यात आले. या सप्ताहात दररोज पहाटे पाच ते सहा पर्यंत काकडा भजन, सकाळी ६ ते ८.३० पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ९ ते ११.३० पर्यंत श्री शिव महापुराण कथा व ज्ञान यज्ञ कथा वाचन, दुपारी १२ ते ५ पर्यंत भजन सायंकाळी ६ ते ७.३० पर्यंत हरिपाठ व भारुड आणि रात्री ९ ते ११.३० पर्यंत श्री शिव महापुराण कथा वाचन ह.भ.प. श्री रमेश पंत आखरे महाराज आर्वी यांनी केले. ज्ञानेश्वरी व्यासपीठ ह भ प श्री तुळशीरमजी महाराज ठाकरे यांनी सांभाळले, ह भ प श्री सुमित महाराज मेश्राम यांनी भारुड सादर केले. या भागवतामध्ये भजनी मंडळ म्हणून अखिल भारतीय पुरुष गुरुदेव सेवा भजन मंडळ, अखिल भारतीय महिला गुरुदेव सेवा भजन मंडळ, बालविकास गुरुदेव सेवा भजन मंडळ, आदिवासी गुरुदेव सेवा भजन मंडळ, महिला गुरुदेव सेवा भजन मंडळ, सर्व खैरी, , साईबाबा महिलाभजन मंडळ १ खैरी, साईबाबा महिला भजन मंडळ २, नगाजी महिला भजन मंडळ, जनाबाई महिला भजन मंडळ, ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळ, गजानन महिला भजन मंडळ खैरी यांचे भजन आयोजित करण्यात आले होते.
अखंड हरिनाम व श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ कथा समाप्तीच्या दिवशी रामनवमीला गावात ग्रंथ दिंडी काढून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. यात गावातील सर्व भजन मंडळी व बाहेरगावातील भजन मंडळानी सहभाग नोंदविला. ग्रंथ दिंडी व भजनाने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. ग्रंथ दिंडी वेळेस गावातील महिला व पुरुषांनी तसेच लहान मुलांनी स्वयंस्फुर्त सहभागी होत मोठ्या संख्येने दिंडीत उपस्थिती होती. भजनी मंडळी व गावातील लहान थोरांनी हाती भगवा ध्वज घेऊन हरिनामाच्या गजरात पाऊले टाकत नयनरम्य व भक्तिमय वातावरण झाले होते. दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी ह.भ.प श्री लक्ष्मण महाराज कुंडकर यांच्या हस्ते गोपाल काल्याचे किर्तन होऊन काल्याचा वाटप करण्यात येऊन महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला व सप्ताहाची सांगता करण्यात आली.
या अखंड हरिनाम श्रीमद् भागवत कथा व ज्ञान यज्ञ तथा भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मुळे श्री राम नवमी पर्वावर संपूर्ण खैरी गावात सप्ताह निमित्त भक्तिमय व आनंदी वातावरण निर्माण झाले होते. या भागवत सप्ताहाचे आयोजन व नियोजन श्री महादेव देवस्थान वारकरी भजन मंडळ खैरी तथा समस्त खैरी ग्रामवासी यांनी केले होते. या भागवत सप्ताहामुळे गेले सात दिवस खैरी गावात हरिनामाच्या गजर सुरू होता.