तापल्यावाचून नव्हे अलंकार!
पिठुनिया सार उरले तें !!


या पृथ्वीवरील प्रत्येकाचे वागणे आचार विचार वेगळे असतात हे मान्य करायला पाहिजे. ज्यावेळी स्वतःला एखादया क्षेत्रात किंवा एका विभागात ठिकाणी सिद्ध व परिपूर्ण आहोत हे दाखवावे लागते तेव्हा त्या व्यक्तीला वेळोवेळी कर्म कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवावे लागेल हे सर्व करावयाचे असल्यास आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरत असतो त्यामध्ये इतरांपेक्षा अधिकचे परिश्रम घ्यावे लागतील एवढे नक्की. छंद किंवा आवड असल्यास त्या बाबीला वेळ न देता ध्येय निश्चिती करावी लागेल त्यामध्ये अनेक अडथळे येतील त्यावर सुद्धा शांततेने मार्ग काढून यश किंवा ध्येय गाठावे लागेल तरच आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत हे वागण्यातून व कृतीतून सिद्ध करू शकतो. व यशस्वी होण्यासाठी दृढ विचाराचे बळ संत तुकोबांना सांगावयाचे असेल कोणतेही काम करत असताना कितीही अडथळा किंवा संकटे आली तरी त्याचे दुःख न करत बसता व राईचा पर्वत करून खचून न जाता अंधकारावर मात ईवल्याशा यशाच्या पणतीचे दिव्यात रूपांतरित केल्यास यशाचे महत्त्व कळते

तापल्यावाचून नवे अलंकार! पिटूनिया सार उरले तें !!
मग कदाकाळी नवे शुद्ध जाती!
नाचे शत्रु होती मित्र ते ची!!
कलेवर बरे भोगू घ्यावे भोगा!!
फांसिले तें रोगा हाती सुटे!!
तुका म्हणे करावे पाठेळ! साहावेची जाळ सिजेवरी!!
अ. क्र.२२९६.

निसर्गाच्या सानिध्यात वावरणे सगळ्याला प्रिय असते. शहरातील लोकांना गावाकडच्या बाबीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात नेहमीच राहिले व तेथील शेती गुरेढोरे संकटाप्रसंगी धावून येणारी आपली माणसे व विविध ठिकाणी हिरव्यागार नटलेल्या बहरलेल्या शेतजमिनी व त्यातून पिकविलेला भाजीपाला हे सगळे करण्यासाठी ज्या मातीला विविध रूपाने घडून व बहरत असणाऱ्या डोलदार पिकाला अनेक दिवसांची वाट बघावी लागते रोग, कीड, निसर्गाचा मारा या सर्व बाबीचा मारा सहन करावा लागतो. पण हे सर्व सहन करत असताना त्याला मोठ्या प्रमाणात यातना होतात किंवा त्रासापासून मुक्ती हवी अशी तक्रार न करता तो निमुटपणे हा त्रास सहन करतो असे घडत असताना जे झाडाला उत्तमरीत्या परिपक्व किंवा त्या वेलीशी घट्ट नाते असलेले पीक चिकटून राहते व परिपक्व होते आणि जे शुद्ध व दमदार आहे असेच फळ पिके उच्च प्रतीचे नजरेस पडतात. त्यामुळे जी अपरिपक्व फळे हे सर्व सहन करू शकत नाही व ती गळून पडतात आणि झाडाला शिल्लक राहतात ती केवळ परिपक्व उत्तम दर्जाची फळे अपरिपक्व फळाची अडथळे सोसण्याची क्षमता नसतेच मुळी! झाडाला किंवा वेलीला आलेल्या फळाला व दर्जेदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी व ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी ऊन वारा व पाऊस किड रोग व निसर्गराजाने निर्माण केलेल्या अनेक संकटांना पार करावेच लागते त्यासोबत मशागत करीत असताना थोड्याफार प्रमाणात त्रास सहन केला असेलच ना! या सर्व बाबीतून जी फळे अपरिपक्व नको असेल ली जाऊन शेतकऱ्याला अपेक्षित असलेला उच्च प्रतीचा माल हाती लागते व दर्जेदार उत्पन्न प्राप्ती होते. आणि आलेल्या पिकाला व फळाकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित होते..

मनुष्य रूपाने देह धारण केल्यानंतर वावरत असताना त्यात आपला सुज्ञ कर्तव्यपणा दिसण्यासाठी अनेक संकटांना व अडथळे पार करावे लागतात अनेक ठिकाणी वेळप्रसंगी मान अपमानाचे नाट्यमय प्रसंग सुद्धा होऊन आपले खच्चीकरण होते पद्धतशीर रित्या अपमान केल्या जातो. तरीपण सगळेच घात अपघात सहन करीत मार्ग काढून स्वतः सिद्ध करावे लागते एखादी कृती आवृत्ती मध्ये रूपांतर करीत असताना अडथळे आल्यानंतर त्याला धीरोदत्त पणे आपण सामना केल्याशिवाय परिस्थिती पाहिजे तशी किंवा आपल्याला पोषक असे घडणे शक्य नसते त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कर्मातून फलश्रुती प्राप्त होते त्यामुळे प्रयत्न आणि कष्ट याबाबतीत तडजोड नाही असे तुकोबा सांगत असतील एक मात्र निमुटपणे या ठिकाणी मान्य करावे लागेल ते असे की आयुष्य हे सगळे मानापमान संकट सोसले असल्याकारणाने नकळतपणे त्रास देणाऱ्या विषयी कुठेतरी नकारार्थी भावनेची उत्पत्ती होते पण हे आपण कायमच जर अंगीकारले तर इष्टमित्रासह आप्तेष्ट सुद्धा दुरावतात व दूर जातात वास्तवात जो व्यक्ती आपल्या चुका आणि वाईट बाबी नियमितपणे सांगतो ते आपल्या योग्यतेसाठीच असते त्यामुळे त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करणे एखाद्या वेळेस आपल्या अंगलट येऊ शकते चांगल्या विचाराने प्रतिबिंब भेटावे व आलेल्या प्रसंगाला नियतीनेच बनवलेले चक्र याचा स्वीकार करावा यातूनच बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा यामध्येच भले असते..
निजरूप असणाऱ्या भगवंताचे सुद्धा असेच असते तो अहंकारी आणि वामार्गाने व व्याज दलालीचा धंदा करून धन कमाविल्यास आणि स्वार्थी वृत्ती धारण करणाऱ्यांना पावत नाही अनेक ग्रंथात आपण ऐकलेच आहे विविध अडचणींना संकटांना तोंड दिल्याशिवाय भगवंत दिसत नाही एखाद्या नवख्या गाईच्या वासराला किंवा गोऱ्याला शंकरपटाला पळायला लावले तर ते सैरावैरा पळत सुटेल त्यांना व्यवस्थित ठरलेल्या ठिकाणावर मापदंडात ठरवलेल्या वेळेवर जावयाचे असल्यास त्यांना घडवावे लागते तशा प्रकारची जडणघडण करावी लागते अनेक वेळा चुकल्यानंतर सुद्धा त्याच्याकडून योग्य व अचूक कवायत कसरत करून घ्यावे लागते व ज्याला या सर्व बाबीची जाण असते हे सगळे सोडून जात नाही

      

हे सगळं प्रक्रिया घडविण्यासाठी तेवढा सरावा करावा लागतो व सकारात्मक वृत्ती प्रवर्तित केल्यानंतर ईश्वराचा शोध घेण्यास मदत होऊ शकते. पृथ्वीवर सजीव स्वरूपात जन्म घेतला म्हणजे तो देह नाशिवंत आहे तर अमर मुळीच नाही एवढे असताना त्यात व्याधीने ग्रस्त जीवन सुद्धा आलेच यावेळी आपण इस्पितळात जाऊन वैद्यराजाकडे व्याधीचे गाराने सांगून तो कसा बरा होईल याकडे लक्ष केंद्रित करतो पण ती व्याधी काही क्षणात संपुष्टात न येता आधी व्याधीवर उपचार केला जात असताना त्या औषधाचा असाहय होणाऱ्या वेदना सहन केल्यानंतरच काही दिवसानंतर ती औषधी व्याधीला दूर सारून मुळावरील घाव कमी होण्यास मदत होते. ध्येय प्राप्ती करायची असल्यास मन हे नजरे सारखे दुर्गामी व चंचल असायला हवे त्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही बैलाच्या खांद्यावर अवताचे जु ठेवल्यानंतर तो जोपर्यंत त्याला ठरवून दिलेल्या खुणेपर्यंत थांबत नाही तसा असतो त्रास निमुटपणे सहन करतो व ठिकाणापर्यंत पोहोचतो.

कर्माच्या सातत्यवादा संदर्भातील एक उदाहरण प्रकर्षाने समोर येते आपण ज्याप्रमाणे बोलतो तशाच प्रकारचे हुबेहूब बोलणारा व शीळ वाजवणारा पोपटराव सर्वांनाच सुपरीचीत आहे तसा हा पक्षी आकाशामध्ये उंच उंच भिरभिरणारा पण बुद्धीच्या भरोशावर माणसाने लोखंडी पिंजऱ्यात कैद केले. त्याचे ते इतर पक्षाप्रमाणे आकाशात भिरभिर उंच उडणे व शेतातील मनाला येईल ते पीक खाऊन उदरनिर्वाह करणे यावर पूर्णतः बंदी आली होती. त्यामुळे काही दिवसातच पोपटराव हतबल झाला व त्यामुळे मोठ मोठ्याने किंचाळात होता समोरील परिस्थिती सुद्धा खूप अवघड होती व पोपटाच्या लक्षात आले की आपल्याला बंदिस्त केलेले असून भल्या मोठ्या पिंजऱ्याला एक भाग खुला आहे तिथे एक छिद्र असून ते अत्यंत लहान असल्यामुळे आपले शरीर त्यात मावणार नाही याची जाण त्याला वेळोवेळी पळून किंवा पिंजऱ्या बाहेर निघून जाण्याच्या प्रयत्नांती लक्षात येऊ लागली आणि त्याच्यासाठी हा काळ संकटाचा होता पण पोपटाची जात अत्यंत हुशार आणि चतुर असते. त्याच्या लगेच लक्षात आले की ज्या पिंजऱ्यात आपण बंदिस्त आहोत त्या पिंजऱ्याचे छिद्र हे आपल्या शरीरापेक्षा मोठे नाही पण तत्काळ बाहेर निघून जाण्याची क्रिया अवलंबने हे जरा जोखमीचे काम होते. एक-दोन दिवस त्याने विचार केला आणि त्याच्या विचारांची ध्यानात आले. मालक आता त्याला रोज मोठ्या प्रमाणात खायला घालत असत पण पोपटराव मात्र पोटभर खाण्यास धजावत नव्हते त्याने स्वतः चा आहार कमी केला त्याचा आहार कमी झाला पण मालक मात्र मोठ्या विचारात पडला नेमके पोपटरावला झाले तरी काय मालक निश्चिंत होता आज नाही उदया खाईल म्हणून आता मात्र रोजच्या कमी आहारामुळे शरीराचा धष्टपुष्टपणा कमी झाला व परिस्थितीशी सामना करण्याची त्याने ठरविले पिंजऱ्याला असलेल्या आकारमानानुसार शरीर घडविले व अलगदपणे पोपटराव एक दिवस त्या लहान असलेल्या छिद्रातून पसार झाले अखेर जोखीम व शरीराचा आकार आहार कमी केला त्याची फलश्रुती पोपटरावांना पळून जाण्यात कामी आली. मालक रोजच्या ठरल्याप्रमाणे बाहेर जात असत व दैनंदिन कार्यक्रम आटोपल्यानंतर पिंजऱ्याकडे जाऊन पोपटाला खायला टाकत असत पण पिंजरा तर कायम होता पक्षी मात्र तिथे नाही त्यामुळे पोपटाचा मालक आश्चर्यचकित झाला तो यासाठी की पिंजऱ्यामध्ये पोपटराव नसल्याकारणाने आणि तो गहन विचारात पडला की पोपटाला इथून बाहेर निघण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अबोल अशा प्राण्याने आपले प्रभुत्व वेगळेपण सिद्ध केलं होतं अत्यंत अवघड बिकट वेळेला त्या पोपटाला सामोरे जावे लागले व त्या अवघड आलेल्या संकटातून सुटका करून घेतली म्हणूनच यातून एक प्रकर्षाने बाब समोर येते ज्याला मानव जीवननात यश मिळवायचे असल्यास संकट अडथळे आलेच पण त्यावर मात करून मार्ग कसा काढायचा आहे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते कोणत्याही पदार्थाची अस्सल चवीची जाण करायची असल्यास त्याला योग्य असे आकार दयावा लागेल ना! अर्थातच तुपाची मूळ चव येण्याकरता अनेक प्रक्रिया होतातच ना तुपाला उजळेपर्यंत घाव सोसावे लागले तसेच उत्तम सत्कर्म उत्कृष्ट कार्य व कर्तृत्व करावयाचे असल्यास त्रास सहन केल्यानंतर शीलवान व्यक्ती घडेल!.


प्रवीण रमेशराव जोशी
मु.पो ढाणकी ता.उमरखेड
जी.यवतमाळ.
९४०४३७३२२१