अवैध वृक्षतोड करणे पडले लाखोच्या घरात , वृक्षमित्र परिवाराच्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

एस. एस. एम. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडून न.प.हिंगणघाट ने केला दोन लाख रुपये दंड वसूल


प्रमोद जुमडे/हिंगणघाट

हिंगणघाट शहरातील नामांकित एस. एस. एम. कन्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांच्या आदेशाने विनापरवानगी आठ वृक्षांची अमानुषपणे कत्तल केल्याचे वृक्षमित्र परिवाराच्या निदर्शनास आल्याने वृक्षमित्र परिवाराने मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना निवेदन देऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली परंतु न.प.ने कारवाई संथगतीने केल्यामुळे वृक्षमित्र परिवाराने जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडे तक्रार केली. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ मुख्याधिकारी न.प. हिंगणघाट यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून सदर मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. नगर परिषदेने झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये कारवाई प्रस्तावित करून मुख्याध्यापकास २५००० प्रती झाडाप्रमाणे एकूण २००००० (दोन लाख रू) दंड देण्यात आला.अधिनियम१९७५ कलम २१ गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये या बाबत खुलासा मागविण्यात आला. संबधित मुख्याध्यापकांनी २४.०६ २०२४ ला न.प.मध्ये २००००० रू धनादेशाद्वारे दंड भरला.सदर कारवाई मूळे अमानुषपणे वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल व वृक्षतोडीस आळा बसेलअसा विश्वास ठेवीत न.प प्रशासनाने केलेल्या कठोर कारवाई बद्दल वृक्षमित्र परिवार व पर्यावरण प्रेमीने समाधान व्यक्त केले.