
शिरपुल्ली शिवारात असलेल्या गांजाच्या शेतातून पोलिसांनी ३५ किलो ओला गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास महागाव व दराटी पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. या प्रकरणी दोनजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रामेश्वर पुंजाजी पोटे (वय ५५) आणि परमेश्वर पुंजाजी पोटे (वय ५२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या शेतात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे धाड टाकून कारवाई करण्यात आली.
फुलसावंगी परिसरातील मागील काही दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे. महागाव पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वडद येथे शेतात धाड टाकून दहा किलो गांजा जप्त केला होता. या प्रकाराच्या खोलात गेल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. अशी या परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. पोलिस विभागाच्या वरिष्ठांनी या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.