राळेगाव येथे श्रीमद् भागवत कथेची पूर्वतयारी पूर्ण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील गांधी लेआउट पटांगण, राळेगाव येथे 23 डिसेंबर 2024 पासून 29 डिसेंबर 2024 पर्यंत संध्याकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत श्रीमद् भागवत कथा प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वृंदावनवासी परमपूज्य बालयोगी श्री गोपाल महाराज कारखेडकर (ता. मानोरा, जि. वाशिम) असून, त्यांच्या सुमधुर वाणीतून भव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा भक्तांना ऐकायला मिळणार आहे.
भागवत सप्ताह आयोजन समिती व साई सेवाश्रम राळेगाव यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हा अध्यात्मिक ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राळेगाव नगरीतील भाविक भक्तांसाठी अध्यात्मिक अनुभव घेण्याची उत्तम संधी आहे. आयोजन समितीने सर्व भक्तगण, महिला भगिनी, युवक-युवतींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून, राळेगाव नगरीत भक्तमंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.