
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेळी येथील एका विधवा शेतकरी महिलेच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्टपासून तालुक्यात पावसाची सुरूवात झाली होती. 13 ऑगस्टला संततधार पावसाच्या तडाख्याने शालू राजू वटाणे या महिलेच्या घराची जुनी भिंत अचानक कोसळली. सततच्या पावसामुळे भिंतींना तडे जाऊन त्या कमकुवत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.भिंत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून शेजारील नागरिक तत्काळ मदतीला धावले. या दुर्घटनेत घराचा एक मोठा भाग पूर्णपणे ढासळला असून, संसारोपयोगी अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर कुटुंबीयांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी अशी मागणी पीडित महिलेने प्रशासनाकडे केली आहे.
