
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देऊन त्यांच्यातील कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून राबविण्यात येणारा ‘क्रिएटिव्हिटी क्लब’ हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही भारतातील ग्रामीण मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासोबतच युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत असलेली देशातील आघाडीची नॉन-प्रॉफिट संस्था आहे. २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेकडो प्रकल्प राबवणारी ही संस्था २०२४–२५ या शैक्षणिक वर्षापासून क्रिएटिव्हिटी क्लब हा विशेष उपक्रम राबवत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळत असून त्यांचे निरीक्षण, सर्जनशील लेखन, कला, विज्ञान आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित होत आहेत.
५ तालुक्यांमध्ये कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, बाभूळगाव, मारेगाव तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या पाच तालुक्यांमध्ये क्रिएटिव्हिटी क्लबची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रत्येक तालुक्यातील विविध गावांमध्ये चॅम्पियन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट-क्राफ्ट, विज्ञान (STEM), थिएटर, व्हिज्युअल आर्ट, गणितीय संकल्पना, आयुष्य कौशल्ये (लाइफ स्कील्स) यांसारख्या विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमांतर्गत गावे निवडून विद्यार्थ्यांची (गाव स्तर), (तालुका स्तर) आणि (जिल्हा स्तर) निवड केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील २०० गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला आहे.
तालुकास्तरीय सम लेव्हल मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रिएटिव्हिटी क्लबमध्ये सक्रियपणे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय सम लेव्हल मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. यामध्ये ५० गावांतील सुमारे ६५ विद्यार्थी सहभागी झाले.मेळाव्यात विद्यार्थ्यांकडून मार्क्स मेकिंग, थिएटर प्रेझेंटेशन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशीलतेची झलक सादर केली.प्रमुख मान्यवरांची उपस्थितीया मेळाव्याला यवतमाळ विभागीय प्रमुख आशिष इंगळे, सेंटर प्रमुख प्रमोद कांबळे, तसेच ज्ञानेश्वर डिवरे, यश ढगे, महेंद्र धुर्वे, ज्योत्स्ना जामनिक, महेश रोहनकार आणि प्रथम टीम उपस्थित होती.
विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा
क्रिएटिव्हिटी क्लबमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, टीमवर्क, नेतृत्व, नवोन्मेषी विचारसरणी आणि समस्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केवळ एक अभ्यासक्रम नसून सर्जनशीलतेचा उत्सव ठरत आहे.
