
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर.
दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी कला, वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव, जि. यवतमाळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मराठी विषयाचे ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. अनंत सूर्यकार यांची विशेष उपस्थिती लाभली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.
कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर आयोजकांच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिल दौलतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थित श्रोत्यांना प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या अनमोल कार्यावर प्रकाश टाकत फुले दाम्पत्यांचे समाजावर असलेले अतुलनीय ऋण विद्यार्थ्यांना अधोरेखित करून सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण व प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनंत सूर्यकार यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा अमूल्य संदेश विद्यार्थ्यांसमोर मांडत सामाजिक जाणीव निर्माण केली. तसेच वर्तमानातील विविध उदाहरणे व दाखले देत स्त्रियांनी स्वतःला स्वावलंबी, सशक्त व जागरूक बनवावे आणि कोणत्याही चुकीच्या चालीरीतींना बळी न पडता “सावित्रीची लेक” म्हणून समाजात अभिमानाने वावरावे, असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे पदसिद्ध अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर यांनी अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले, “जर एक पुरुष शिकला तर तो एकटाच सुशिक्षित होतो; मात्र जर एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला सुशिक्षित करते.” त्यामुळे स्त्री शिक्षण व स्त्री सशक्तीकरणाला अधिकाधिक वाव देणे आज काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी बी.ए. भाग दोन ची विद्यार्थिनी कु. सुहानी कुमरे हिने ‘मी सावित्री बोलते’ हे एकपात्री नाटक सादर केले तर बी. ए. भाग एक चा विद्यार्थी चि. मयूर राजुरकर याने ज्योतिराव फुलेंवर आधारित गीत सादर केले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शालिनी हटवार यांनी केले, तर वाणिज्य विभागाचे प्रा. निलेश पडाल यांनी उपस्थित पाहुणे, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
