
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. 26 फेब्रुवारी रोजी गाव पिंपळखुटी व शिवारा येथे ‘उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा’ अंतर्गत जनजागृतीपर पतनाट्याचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन स्पेक्ट्रम फाऊंडेशन, वर्धा व मैत्री साधना फाउंडेशन, वर्धा यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या जनजागृतीपर पतनाट्याद्वारे शेतकऱ्यांना उत्तम कापूस उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सुधारित बियाण्यांची निवड, मृदा व्यवस्थापन, आंतरपीक लागवड, कीड व रोग नियंत्रण, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बालमजुरी प्रतिबंध, कामगारांचे हक्क तसेच शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. कलाकारांनी प्रभावी अभिनय व संवादातून संदेश पोहोचवला, ज्यामुळे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्प व्यवस्थापक नरेश बाजरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमामुळे गावात उत्तम कापूस निर्मितीबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली. भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पदाधिकारी लक्ष्मण यादस्कर, हितेश भोयर, राम वंदकर सर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते
