
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ येथे सुरू असलेल्या भव्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात नवनवीन तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसायांची रेलचेल पाहायला मिळत आहे. मात्र, या महोत्सवात सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे ती म्हणजे राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील प्रयोगशील शेतकरी हरीश काळे यांची ‘उसाची नॅचरल कुल्फी’. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः या स्टॉलला भेट देऊन कुल्फीचा आस्वाद घेतला आणि शेतकऱ्याच्या या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. राळेगाव तालुक्यातील रिधोरा या गावातील हरीश काळे या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला जोडधंद्याची जोड देत उसाच्या रसापासून नैसर्गिक कुल्फी तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या कुल्फीमध्ये कोणत्याही कृत्रिम रंगाचा किंवा साखरेचा वापर न करता, उसाच्या नैसर्गिक गोडव्याचा उपयोग केला जातो.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
महोत्सवातील विविध स्टॉल्सची पाहणी करत असताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काळे यांच्या स्टॉलवर थांबून कुल्फीची चव घेतली. “शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन न घेता, अशा प्रकारे प्रक्रिया उद्योगाकडे वळणे काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल काळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कडाक्याच्या उन्हात नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून कृषी महोत्सवात येणारे नागरिक या उसाच्या कुल्फीला पसंती देत आहेत. ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीचा हा एक उत्तम नमुना या निमित्ताने समोर आला आहे.
प्रतिक्रिया
“केवळ पारंपरिक पद्धतीने ऊस विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. उसाच्या नैसर्गिक रसापासून बनवलेली ही कुल्फी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे, याचा आनंद आहे. आज खुद्द जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या स्टॉलला भेट देऊन कुल्फीचा आस्वाद घेतला आणि कौतुक केले, यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मनोबल वाढले आहे. शेतीला अशा आधुनिक प्रयोगांची जोड दिल्यास तरुण शेतकरी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.”असे मनोगत
प्रयोगशील शेतकरी हरीश काळे यांनी व्यक्त केले
