
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ग्रामीण रुग्णालय कळंब येथे कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक श्री. महेश शिंदे हे वयोमानानुसार दि. ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवेला मानाचा मुजरा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने नुकताच सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर मडावी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश मडावी, सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर राठोड, डॉ. प्रशांत कनाके, ग्रामीण रुग्णालय रूग्ण कल्याण समिती माजी अशासकीय सदस्य अशोक उमरतकर, डॉ. ठमके, डॉ. डोंगरे, श्री. भुजबळ सर, डॉ. ताकसांडे मॅडम, श्री. मोटे, डॉ. वानखेडे, श्री. शेरजे, श्री. अवस्थी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात श्री. महेश शिंदे यांचा सहपत्नी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपणे व जबाबदारीने काम करत रुग्णालय प्रशासनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निवृत्तीमुळे रुग्णालयातील एक अनुभवी, कर्तव्यदक्ष व सर्वांना आपुलकीने साथ देणारा कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी प्रमुख अतिथी डॉ. उमेश मडावी यांनी आपल्या भाषणात श्री. शिंदे यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव करताना, त्यांनी अनेक वर्षे रुग्णालयाच्या कामकाजात उल्लेखनीय योगदान दिल्याचे सांगितले. तर डॉ. मधुकर राठोड यांनी श्री. शिंदे यांच्या कार्यकुशलतेचे, संयमी स्वभावाचे व सहकाऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे कौतुक केले.अध्यक्षीय समारोपात डॉ. मधुकर मडावी यांनी श्री. महेश शिंदे व त्यांच्या परिवारास पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व यशाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, श्री. शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व सेवाभाव यांचा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याची आठवण सर्वांना कायम राहील.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलोणे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रेवन परकटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. जिचकार सर, गायकवाड, नगराळे, नावी, ब्राम्हणे तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात उपस्थितांनी श्री. महेश शिंदे यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना निरोप दिला.
