
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा परिसरात राणडुकराच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद शंकरराव सोनवणे (रा. मुसळ)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, कळंब असून दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ते आपल्या शेतात बैलांना चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या राणडुकराने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रणडुकराचे दात त्यांच्या हातात घुसल्याने तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे काही महिन्यांपर्यंत त्यांना शारीरिक हालचाल करणे कठीण होणार असल्याने शेतीचे काम आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर मोठा परिणाम होणार आहे. शिवाय उपचारासाठी मोठा खर्चही होत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जखमी शेतकरी प्रमोद शंकरराव सोनवणे यांनी वन विभागाकडे अर्ज करून आपल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून वन विभागाच्या नियमांनुसार तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या अर्जासोबत उपचारासंबंधी आवश्यक कागदपत्रेही जोडण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नीलेशभाऊ झांबरे, राष्टवादी काँग्रेस कळंब तालुका अध्यक्ष व कार्यकर्ते नीलेश मरापे, गणेश दुधकोहळे, अतुल झांबरे, मुरली घाटे, पवन भिसे यांनी जखमी प्रमोद सोनवणे यांची भेट घेऊन तातडीने आरोग्य विभागमध्ये त्यांना भरती केले व त्यांची विचारपूस केली तसेच आणि वन विभागाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली.
डोंगरखर्डा परिसरात राणडुकरांचा वाढता त्रास लक्षात घेता वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
