
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथील कु. वैष्णवी लक्ष्मण घोडाम (रा. मेटीखेडा) या विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वैष्णवी ही पांढरकवडा तालुक्यातील आसोली येथील मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी कला शाखेत शिक्षण घेत होती.
परीक्षा झाल्यानंतर तिला मळमळ आणि उलटीसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास प्रकृती अधिक बिघडल्याने तिला तातडीने मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने पुढील उपचारासाठी तिला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यानेवैष्णवीची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित असते, तर आपल्या मुलीचा जीव वाचू शकला असता, अशी भावना वैष्णवीचे वडील लक्ष्मण घोडाम यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
