
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वडकी पोलिसांची धाडसी कारवाई आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार
राळेगावकडून वडकीच्या दिशेने गोवंश भरून एक आयशर वाहन येत असल्याची गुप्त माहिती आज पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास वडकी पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राळेगाव-वडकी मार्गावरील उमरेड टोल नाक्यावर अवजड वाहनाच्या सहाय्याने नाकाबंदी केली. मात्र संबंधित वाहन टोल नाक्यावर न येता खेडगाव मार्गे विहीरगावकडे जात असल्याचे निदर्शनास आले, वडकी पोलिसांनी तत्परता दाखवत विहीरगाव चौफुली परिसरात रस्ता अडवून संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आयशर वाहन चालकाने वाहन रस्त्यावरच उभे करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक MH 40 BG 8744 मध्ये तब्बल २५ गोवंश (बैल) कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. यामध्ये ६ गोवंश मृत अवस्थेत तर १९ गोवंश जिवंत असल्याचे निदर्शनास आले. जिवंत जनावरांची अंदाजे किंमत प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे सुमारे ३ लाख ८० हजार रुपये तसेच आयशर वाहनाची किंमत २० लाख रुपये असा एकूण २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या सर्व गोवंशांना प्राथमिक उपचारानंतर गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५अ, ५ब तसेच प्राण्यांवर क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. पिंटा सा., अपर पोलीस अधीक्षक श्री. थोरात सा. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. बंसल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी ठाणेदार सुखदेव भोरडे, पोहवा/१८३५ निलेश वाईडे, पोलीस/९०६ सुरेश नगराळे, चालक सफो/७१६ दीपक मडकाम तसेच राळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश डोंबे व नवचालक मपोशी/प्रतिभा तितरमारे यांनी संयुक्तरीत्या केली. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत.
