
(रात्रभर जागृती, होमहवन, कीर्तनआणि अखंड महाप्रसादाने खैरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली)
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
खैरी येथे श्री शनिदेव जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला. शनिदेव उत्सव समिती व शनिदेव भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात खैरीसह परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.
१५मे रोजी रात्री शनिदेव जागृती कार्यक्रमाने उत्सवाला प्रारंभ झाला. भजन, किर्तन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती .
शनिवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत विविध धार्मिक विधी पारपडले .यामध्ये कलश स्थापना, गणपती पूजन, श्री शिव-हनुमंत पूजन, आदित्य शतनामावली सूर्य पूजन, श्री शनेश्वर अभंग स्नान, महापूजा व अभिषेक, मूर्ती सजावट, वस्त्राभूषण तसेच होम-हवन यांचा समावेशहोता.
धार्मिक विधींनंतर दुपारी २ वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे, दुपारपासून सुरू झालेला महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यंत अखंड सुरू होता. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शनिदेव उत्सव समिती व गावातील भक्तगणांनी अथक परिश्रम घेतले.ऊत्सव काळात भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असूनही कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि भक्तिभावाने पार पडला. गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळांनीही उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान काही अनावधानाने त्रुटी राहिल्या असल्यास त्याबद्दल शनिदेव उत्सव समिती व भक्तगणांनी जनतेची दिलगिरी व्यक्त केली. “याच अनुभवातून प्रेरणा घेऊन पुढील वर्षी आणखी भव्य, दिव्य आणि उत्तम पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे,” अशी भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.खैरी गावात संपन्न झालेल्या या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, सामाजिक ऐक्य आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन या निमित्ताने घडून आले.
