
“हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच खरी समाजसेवा” — तलाठी हर्ष गायकी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात NMMS परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचा राळेगाव तालुक्यातील खैरी येथे तलाठी कार्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी खैरी येथील तलाठी हर्ष गायकी यांनी विद्यार्थिनींना स्कूल बॅग व शालेय साहित्य किट भेट देऊन त्यांचा गौरव केला.
NMMS परीक्षेत यश संपादन करणाऱ्या साक्षी सरपते, संबोधी भारशंकर, कल्याणी भारशंकर व जानवी इंगोले या विद्यार्थिनींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना तलाठी हर्ष गायकी आणि मंडल अधिकारी दिलीप चिडे यांनी, “ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करावे,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी देखील भविष्यात अधिक मेहनत घेऊन शिक्षणात यशस्वी वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमाला मंडल अधिकारी दिलीप चिडे, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुंभलकर तसेच शिक्षक किसन सिडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित केले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये तलाठी हर्ष गायकी हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी ते सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असतात.विशेष म्हणजे, खैरी गावात प्रथमच NMMS परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना अशा स्वरूपात प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
