
अपहृत तरुणाची हत्या करणारे आठ मारेकरी जेरबंद४८ तासांत उलगडा; अनैतिक संबंधातून हत्याकांड घडल्याचा संशय
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वडकी पोलीस स्टेशनच्या होतील कारेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात युवकाचा मृतदेह आढहला होता. युवकाचे अपहरण करून हत्या केल्याचा उलगडा करीत पोलिसांनी आठ मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.सुरेश श्याम पवार (३३) तिरझडा असे मृताचे तर सुनील कुचनकार (२५) विजय कुचनवार (३०), विशाल जाधव (२५) तिघेही रा. साखरा, निलेश कुचनकार रा. पांढरकवडा, गणेश आत्राम (२७) रा. ताड उमरी ता. पांढरकवडा,मिथुन उईके (३२ ) रा. पांढरकवडा किरण अंकुलवार (२८) रा. ताड उमरी (चारचाकी चालक), अमोल नळे (२५) रा. घोन्शी ता. केळापूर अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहे. कळंब तालुक्यातील तिरझडा येथील पारधी वस्तीमध्ये मृतक राहत होता. १५ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताच्या दरम्यान चारचाकी वाहनात बसून आठ इसम त्याच्या घरी आले. त्याला जबरदस्तीने वाहनात बसवून त्याचे अपहरण केले. हा प्रकार युवकाच्या पत्नी शालिना पवार हिच्या लक्षात येताच तिने मध्यरात्री कळंब पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदार अजीत राठोड यांनी तक्रार दाखल करून घेत गुन्हे नोंदवून युवकाचा शोध सुरू केला. दरम्यान १७ नोव्हेंबरला वडकी पोलिसांच्या हद्दीतील कारेगाव येथील वर्धा नदीचे पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. यावेळी वडकीचे ठाणेदार विनायक जाधव व त्यांच्या स्टाफ घटनास्थळी दाखल झाले.
मृतकाची ओळख पटत नसतानाच कळंब पोलिसांनी अपहरण झालेला सुरेश पवार आहे का, याची चौकशी केली. सुरेशची पत्नी व मोठा भाऊ यांनी हा सुरेशचाच मृतदेह असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरेशचे अपहरण कशासाठी केले, त्याचा मृत्यू कसा झाला, याचा तपास कळंब, पांढरकवडा पोलिसांसह एलसीबी पथकाने सुरू केला. तसेच राळेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान मृतकाच्या पत्नीने बुटीबोरी, तिरझडा व साखरा येथील काही लोकांची नावे सांगितली. पोलिसांना ‘क्ल्यू’ मिळताच तिन्ही पोलीस पथकांनी बुटीबोरी व तिरझडा गाठले. परंतु येथील दोघांचाही खुनाशी संबंध नसल्याचे लक्षात आले. तर पांढरकवडा तालुक्यातील साखरा येथील सुनील कुचनारला ताब्यात घेतले. त्याने अपहरण करून युवकाचा खून केल्याची कबुली दिली. तसेच हे हत्याकांड आठ जणांना मिळून केल्याचे सांगत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अपहरण झालेल्या युवकाच्या खुनाचा उलगडा करीत आठ मारेकऱ्यांना अटक केली. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजीत राठोड, एपीआय चौधनकर, पीएसआय किशोर मावसकर करीत आहे.
दुपट्टयाने गळा आवळल्याने मृत्यू
मृतक सुरेश याचे अपहरण करून चारचाकी वाहनात टाकून नेत असताना तो आरडाओरड करीत होता. त्यामुळे त्याच्या तोंडाला दुपट्टा बांधून व गळ्याला दुपट्टा आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रात्री ११ वाजता वाहनातून काढून सुरेशचा मृतदेह पुलावरून नदीत फेकून दिल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली आहे. मुख्य मारेकऱ्याचे एका महिलेशी अनैनिक संबंध होते. मृतक त्या महिलेच्या नातेसंबंधातील होता. त्यामुळे त्याचे त्या महिलेच्या गावात जाणे-येणे होते. मृतक सुरेश आपल्यावर वाईट नजर टाकत असल्याचे त्या महिलेने मुख्य मारेकऱ्याला सांगितले होते. त्यातूनच रागाच्या भरात सुरेशचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे ठाणेदार अजीत राठोड यांनी सांगितले. तसेच अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली.
