जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र , काटोल येथे भारतीय संविधान दिन साजरा

मानवी मूल्यांचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान – खुशाल कापसे

तालुका प्रतिनिधी/२७ नोव्हेंबर
काटोल : भारतीय संविधानाचा आत्मा हा उद्देशिका आहे.माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी व समाजाला नवीन दिशा देण्याचे सामर्थ्य भारतीय संविधानात आहे.भारतीय संविधान मानवी मूल्यांचा जाहिरनामा असल्याचे प्रतिपादन संविधान स्तंभाचे निर्माते खुशाल मधुकरराव कापसे यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे संविधान दिन निमित्त आयोजित ‘ ग्रेट भेट ‘ कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, प्रमुख वक्ते संविधान स्तंभ निर्माते खुशाल कापसे, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान सर्धेतील अनुक्रमे तीन विजेते आदित्य बाभूळकर, मनिष लाड व जुही फुकटकर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
पुढे खुशाल कापसे म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या शाश्वत मानवी मूल्यांचा पुरस्कार करून व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासण्याचे कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून होत आहे.परंतु संविधानाची यशस्वीता ही अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे सम्यक विचार करणारी व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे.म्हणून ‘संविधान दिन’ फक्त उत्सव म्हणून नव्हे तर विचार प्रेरणा दिन म्हणून साजरा व्हावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर , संचालन हिमांशी भोरे तर अरुणा नेहारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक मंगेश लाडसे व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बॉक्स
लोकसहभागातून संविधान स्तंभ निर्मिती..
ज्या संविधानाने माणसाला जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला त्या संविधानाबाबत शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून खुशाल कापसे यांनी पारशिवनी येथे देशातील पहिला संविधान स्तंभ व जि.प.प्राथमिक शाळा, गरांडा येथे सुद्धा संविधान स्तंभ निर्माण केला.
जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी जिल्ह्यातील जि.प.शाळेत ‘संविधान स्तंभ’ निर्मितीकरिता पुढाकार घेतला.