
प्रतिनिधी:प्रवीण जोशी, ढाणकी
★इंग्रजीतील ‘Demoeracy’ या शब्दाचे मराठीत लोकशाही असे भाषांतर केले जाते. इंग्रजीतील डेमोकेसी हा मुळ ग्रीक शब्द आहे. Demos म्हणजे लोक आणि Cratos म्हणजे सत्ता याचा अर्थ लोकांची सत्ता असा होतो. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीच्या केलेल्या व्याख्येनुसार “लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय.
आज भारतातील शासनव्यवस्था लोकशाही या संकल्पनेनुसार चालत असून भारतातील लोकशाही ही केवळ बहुमतापुरती नसून ती घटना व घटनेतील कायद्यानुसार चालवली जाते. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून ती कायद्यानुसार चालवली जाते. त्यामुळे लोकशाही पुरस्कृत समाज निर्माण होणे ही काळाची गरज असून लोकशाहीभिमुख समाज निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून लोकशाहीचे संवर्धन आणि तंतोतंत अंमलबजावणीसाठी युवकांची भुमिका अत्यंत महत्वपुर्ण आहे..
लोकशाही जिवंत ठेवून तिचे जतन व संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरीकांची जबाबदारी असून सर्वांना समान संधी मिळण्यासाठी सातत्यपुर्ण व जनजागृती केल्यास देशातील लोकशाहीचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरेल यात तिळमात्रही शंका नाही. यासाठी युवकांनी ही जबाबदारी स्विकारून लोकशाहीचा दुत म्हणून कार्य करावे ही काळाची गरज बनली आहे. सर्वांना समान संधी आणि एकसमान वागणूक यासाठी लोकशाही आग्रही असते. लोकशाहीत सुशासनाच्या प्रस्थापनेसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे अपेक्षित असते. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीत विचारमंथन व प्रयत्न करणे हे आवश्यक असून शिक्षण, प्रयत्न व जागृती या त्रिसुत्रीचा आधार घेवून लोकशाहीला पुढे घेवून जाणे महत्वाचे आहे. हाच लोकशाहीचा गाभा देखील आहे.
भारत हा एक प्राचिन संस्कृतीतील एक तरूण लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या प्राचिन इतिहासाकडे पाहिल्यास देशाच्या विकासात युवकांचा मोठा सहभाग दिसून येईल. युवक हे शक्ती, उर्जा, शौर्य, नविनता, चिकाटी व उत्कंटतेचे प्रतिक असतात. त्यामुळे जगातील होत असलेले बहुतांश बदल हे युवकांमुळेच घडत असतात. भारताचा स्वातंत्र्यलढा असो का फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती असो अथवा चीनमधील साम्यवादी क्रांती या सर्व घटनांमधील सर्वसमान धागा म्हणजे ‘युवक’…. आपला देश आज एक उदयनशील शक्तीकेंद्र म्हणून जगासमोर येत असताना भारतातील लोकशाहीच्या संवर्धनाची महत्वपुर्ण जबाबदारी युवकांच्या खांद्यावर येवून ठेपली आहे. देशात विविध प्रश्न निर्माण झाले असून देशातील लोकशाहीबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. लोकशाहीच्या राज्यव्यवस्थेची कल्पना फार प्राचिन काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे लोकशाही या संकल्पनेचा मुर्त व तत्वज्ञानी स्वरूपांचा विचार केल्यास लोकशाहीच्या संवर्धनात युवकांची भुमिका अत्यंत निर्णायक व महत्वपुर्ण ठरणार यात तिळमात्रही शंका नाही….
