काही दिवसापूर्वी झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे ?


जिल्हा प्रतिनिधी ::प्रवीण जोशी


ढाणकी मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शहरातील सिमेंट रस्त्याचे वास्तव समोर आणले असून निष्कृष्ट झालेल्या बांधकामामुळे रस्ते वाहून गेल्याचे चित्र ढाणकी शहरात दिसून येत आहे. शहरातील रस्त्याची कामे हे गुणवत्तापूर्वक न झाल्याने बऱ्याच जागी रस्त्याला तडे गेलेले आहेत तर काही जागचा रस्ता  उखडल्या गेला. यासंदर्भात  नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ढाणकी शहरात शासनाने करोडो रुपये खर्च करून सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम केले. काही ठिकाणी नालीचे कठडे सुद्धा  काही ठिकाणी पडले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ता बनवताना संबंधित ठेकेदाराने  हलगर्जीपणाने  हलक्या दर्जाचे मटेरियल वापरून व शासनाने घालून दिलेले निर्देश न पळता फक्त आपल्या  फायद्यासाठी  शासनाच्या करोडो रुपयाला चुना लावत हलका रस्ता बनवला. त्यामुळे या या रस्त्याचे आयुष्य किती दिवस  राहील  हा मोठा प्रश्न आहे.
 प्रभाग क्रमांक  3 मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत नुकतेच रस्त्याचे काम झाले. हे काम चंद्रपूर स्थित चिंचोलकर नामक ठेकेदारा ने  केले. हे काम चालू असताना अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराची हिम्मत वाढून त्याने थातूरमातुर पद्धतीने रस्ता करून बोगस काम नागरिकांच्या माथी मारले त्यामुळे एका पावसातच रस्ता  वाहून गेल्याचे चित्र आहे. अजून पावसाळा बाकी असून पावसाळ्यात रस्ता राहील की नाही याची सुद्धा आता शाश्वती राहिली नाही. त्यामुळे  या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी सुद्धा जोर धरत आहे.
कोणतेही बोगस काम अधिकाऱ्यांना हाताशी घेतल्या शिवाय होत नाही. प्रभाग 3 मधील बोगस बांधकामात काही अधिकाऱ्यांचे हात ओले झाले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे त्याशिवाय बोगस कामाना मुकसंमती मिळत नाही. अशा दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.