
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या एक महिन्यापासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत असल्यामुळे व्यापारी आणि सामान्य जनतेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
काल रात्री बसस्थानक परिसरात असलेल्या प्रशांत रुपारेल यांच्या जनरल स्टोअर्स, अशोक वर्मा यांचे किराणा दुकान आणि मयूर घोडे व प्रकाश पामपत्तीवार यांच्या हॉटेलमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या सर्व ठिकाणांहून सीसीटीव्ही कॅमेरे, रोख रक्कम व इतर कीमती माल लंपास करण्यात आला आहे. या चोरीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना केवळ एका रात्रीची नसून, मागील काही आठवड्यांपासून अशाच प्रकारच्या अनेक घटना घडत असूनही त्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
“पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने का घेत नाही? चोरांना अटक कधी होणार?” असे प्रश्न आता जनतेच्या तोंडी आहेत. चोरीच्या या सत्राला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन कधी आणि कसे पावले उचलणार, याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे.
