
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिके घेण्यास अनेक अडचणी येत असल्याने कोणते बियाणे , खते,कीटकनाशके वापरण्यात यावी,उत्पादन वाढीसाठी कोणते प्रयोग शेतात करावे? याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ग्राम पंचायत स्तरावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेली कित्येक वर्षापासुन शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाची मालीका कायम आहे, तालुक्यातील शेतकरी एका पाठोपाठ एक अनेक संकटाचा सामना करीत असतांना मागील काही वर्षापासुन फवारणीतुन विषबाधा होऊन अनेकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले तसेच ही शाई वाळते न वाळते तोच गुलाबी बोंड अळी, बोंडसडने आक्रमण करून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र कृषी विभागाकडुन आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे तालूक्यात या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले नाही. चालु वर्षात तालुक्यातील शेतकरी पिक पेरणी बाबत संभ्रमावस्थेत असतांना बदलत्या हवामानानुसार कोणते बियाणे, खते, कीटकनाशके वापरण्यात यावी,मातीचा पोत कसा तपासावा याकरिता कृषी विभागाकडुन राळेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करून जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तालुका कृषी कार्यालया अंतर्गत असलेल्या मंडळ कृषी अधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रात दौरा , शिवार भेट,किंवा मार्गदर्शन शिबिर न घेता सर्व कागदोपत्री दाखवुन शासनाच्या निधीची लूट करीत आहेत.त्यामुळे मागील काळात घेण्यात आलेल्या सर्व कार्यशाळा,मार्गदर्शन शिबिराची माहिती घेतल्यास सर्व गौड बंगाल बाहेर येईल.शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करा.
(मनसेची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी)
:- शंकर वरघट (उपजिल्हाध्यक्ष मनसे यवतमाळ)
