
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कर्जमाफी सह शेतकऱ्यांना सन्मान, न्याय मिळण्याच्या मागणी करीता बच्यु कडू यांनी पापळ ते चिलगव्हाण दरम्यान 7/12 कोरा यात्रा काढली. अनेक सामाजिक, राजकीय संघटनानी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र सरपंच संघटनेने देखील या पदयात्रेला जाहीर पाठिंबा दिला. संघटनेचे विदर्भ सरचीटणीस सुधीर जवादे यांनी तशी घोषणा केली आहे. सोबतच या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जिवंत मातीच्या स्वातंत्र्याचा लढा, 7/12 कोरा या मुख्य मागणीसह, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर,दिव्यांग, महिलांना न्याय देण्यासाठी ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यात आहे. निगरगट्ट शासनाच्या डोळ्यात झणझनीत अंजन घालण्याचे व शेतकऱ्यांच्या एकिकरणाचे मोठे आंदोलन यातून उभे राहणार असल्याने, ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाकरीता हा हक्काचा लढा असल्याने महाराष्ट्र सरपंच संघटनेने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
आज ग्रामीण भागात प्रचंड असंतोष आहे. शेतीची अवस्था दयनिय झाली असून जगाचा पोसिंदा शेतकरी हा आत्महत्याच्या गर्तेत सापडला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला कमी बाजारभाव, शासनाचा तुघलकी व्यवहार अशी अनेक कारणे त्या मागे आहे.कर्जमाफी चे दिलेले वचन सुद्धा हे सरकार पाळत नाही. अशा वेळी बच्युभाऊ कडू यांनी भव्य पदयात्रा सुरु करून हे प्रश्न ऐरणीवर आणले. या आंदोलनाला महाराष्ट्र सरपंच संघटना जाहीर पाठिंबा देत आहे. संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व गावं पातळीवरील शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनीं यांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे.
– सुधीर जवादे
विदर्भ सरचिटणीस
महाराष्ट्र सरपंच संघटना
