
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव येथील शितला माता मंदिर परिसरात मांस विक्रीची दुकाने जवळपास १५ वर्षापासुन अतिक्रमण केलेल्या जागेत असुन, सध्या स्थितीत या व्यवसायाचे येथे मार्केटच तयार झाले व यातील काही दुकाने मंदिराचे भिंतीला टेकलेली आहे. ही सर्व दुकाने मंदिरापासुन ५० मिटरचे आत असल्यामुळे मंदिर परिसरात दुर्गंध पसरलेला असतो. यामुळे येणाऱ्या सर्व भक्त मंडळीला भरपूर त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही या संदर्भात स्थानिक प्रशासनास निवेदन देण्यात आले होते, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भाविकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हजारो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्यसाधारण आहे. यासाठी मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवणे आणि मंदिरांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे. या दृष्टीने धार्मिक स्थळांच्या मंदिर परिसरात मद्य-मांस यांची विक्री होणे, हे मंदिरांचे पावित्र्य भंग करण्यासमान आहे. मांसाहार करून अथवा मद्यपान करून मंदिर परिसरात येणे, हे देखील अयोग्य आहे. जर या परिसरात यांची विक्री होत आहे, तर मद्यपी लोक मंदिरात शिरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा मद्यपींकडून मूर्तीची विटंबना होण्याचीही शक्यता वाढते. भारतीय संविधान कलम २५ नुसार सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. यानुसार हिंदु धर्मात त्याज्य असे मद्य आणि मांस हिंदूंच्या धार्मिक स्थळी विक्री करण्यास अनुमती देणे, ही हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय. मंदिर परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त होणे अत्यावश्यक आहे.
या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भातील निवेदन २३ जुलै या दिवशी नगर पंचायत मुख्याधिकारी श्री. गिरीश पारेकर तसेच उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील यांना देण्यात आले, यावेळी त्यांनी महासंघाच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन देतांना श्रीराम मंदिराचे मेघश्याम चांदे, गजानन महाराज मंदिराचे सुरेश पाटील, दिलीप दुदगीकर, विठ्ठल मंदिराचे भूपेंद्र करिया, श्रीराम मंदिर वाढोणा बाजारचे भास्कर मानकर, अरुण भरणे, ज्ञानेश्वर तुराळे, श्रीराम जन्मोत्सव समितीचे चंद्रकांत मशरू, रावेरी येथील हनुमान मंदिराचे चंद्रकांत गोहने, सावंगी येथील रामचंद्र देवस्थानचे चंद्रशेखर ढूमने, नगरसेवक मंगेश राऊत, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राळेगाव तालुका संयोजक अनिल वर्मा, जिल्हा संयोजक भगवानजी डगवार, हिंदू जनजागृती समितीचे प्रफुल्ल टोंगे, महासंघाचे यवतमाळ जिल्हा संघटक दत्तात्रय फोकमारे यांसह अन्य मंदिरांचे पदाधिकारी आणि भक्त उपस्थित होते.
