
36व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक पटकावत भूषवले उपविजेते पद
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नागपूर येथे दिनांक 19 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान पार पडलेल्या 36व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025–26 (पुरुष व महिला) मध्ये महाराष्ट्र पुरुष संघाने देशपातळीवर दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद भूषवले आहे. या स्पर्धेत पुण्याचा खेळाडू प्रशांत चव्हाण याचे मोलाचे योगदान आहे.या यशामुळे महाराष्ट्रासह पुणे शहराच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात खेळाडू प्रशांत चव्हाण यांच्यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.
टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया (TBCFI) यांच्या मान्यतेखाली आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील अव्वल संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघाने शिस्तबद्ध, सांघिक व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली.
या उल्लेखनीय यशात पुण्याचे खेळाडू प्रशांत चव्हाण यांचे योगदान विशेष ठरले. अंगात ताप असताना देखील प्रशांत चव्हाण यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांच्या सहभागाबद्दल त्यांना अधिकृत राष्ट्रीय प्रमाणपत्र (Merit / Participation Certificate) प्रदान करण्यात आले आहे. हे यश पुणे शहरासाठी विशेष अभिमानाचे ठरले आहे.
महाराष्ट्र संघाच्या या यशामागे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री.मोहम्मद बाबर यांचे नियोजन, मार्गदर्शन व संघटनात्मक नेतृत्व मोलाचे ठरले असल्याचे क्रीडा वर्तुळातून सांगण्यात येत आहे. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि खेळाडूंना त्यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळामुळेचं संघाने राष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी साध्य केली.अशी भावना व्यक्त करण्यात येतं आहे.
महाराष्ट्र संघाच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ही कामगिरी राज्यातील टेनिस बॉल क्रिकेटसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
