
(प्रतिनिधी) शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील मौजा सावळेश्वर आणि सिंदगी येथील रेतीघाट धारकांकडून होत असलेल्या अवैध रेती उत्खननाची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी एका अर्जाद्वारे तहसीलदार कडे केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, मौजा सावळेश्वर व सिंदगी येथील रेती घाटाचा लिलाव झाला असून, अधिकृतपणे काही विशिष्ट शेत सर्वे नंबरमधूनच उत्खननाची परवानगी आहे. मात्र, संबंधित रेतीघाट धारक नेमून दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर नदीपात्रातून आणि परिसरातून बेकायदेशीरपणे रेतीचे उत्खनन करत आहेत.
या अवैध उत्खननामुळे शासनाची दिशाभूल होत असून नदीपात्रात खोल खड्डे करून निसर्गाचा समतोल बिघडवला जात आहे तसेच यामुळे पर्यावरणाची आणि महसुलाची मोठी हानी होत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. दररोज शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून,अवैध पणे हजारो ब्रास रेती साठवून ठेवत आहे.
तहसीलदार यांना निवेदन देत अर्जदार यांनी मागणी केली आहे की,नदीपात्रात झालेल्या अवैध उत्खननाचे महसूल विभागामार्फत तातडीने मोजमाप (Measurement) करून त्यांनी ज्या वाळू घाटातून ठरवलेल्या ब्रास पैकी किती ब्रास रेती काढली आहे याची चौकशी करून बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या रेतीघाट मालकावर आणि संबंधित यंत्रणेवर कडक कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात यावा.
रेतीची अवैध वाहतूक आणि ओव्हरलोडिंग रोखण्यासाठी घाट परिसरात ट्रिप प्रत पावती तपासणीसाठी तात्काळ चौकी (Check Post) कार्यान्वित करून महसूल अधिकारी नियुक्त करण्यात यावा.
एकाच रॉयल्टी पासवर (e-TP) वारंवार फेऱ्या मारून होणारी वाहतूक थांबवण्यासाठी घाटावर CCTV बसवून कारवाई करावी.
जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही आणि अवैध उत्खनन थांबत नाही, तोपर्यंत सदर घाटाचे काम थांबवण्यात यावे.या मागणीचे निवेदन मुकेश मल्हारी ईरनलवार,योगेश दिगांबर गायकवाड, बालू सदानंद वाघ,विशाल गणेशराव नरवाडे आणि श्रीनाथ सुरेश गौरवाड यांनी उपविभागीय अधिकारी मुळे, उमरखेड तहसीलदार राजू सुरडकर,यांना दिले आहे. यावर आता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब तक्रारीची दखल घेऊन संबंधित तलाठी किंवा मंडळाधिकाऱ्यांना (Circle Officer) प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश देतील का? यावर आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
