
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सध्याच्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन सिलिंडरचा साठा करणाऱ्यांवर पुरवठा प्रशासनाने दणका दिला असून सावनेर येथे एका किराणा दुकानातून १३ घरगुती व २ व्यावसायिक असे एकूण १५ सिलेंडर व एक प्लास्टिक डबकीत १५ लिटर पेट्रोल जप्त करून मोठी कारवाई केली आहे.
इराण युद्धामुळे लोकांमध्ये टंचाईची भीती वाढली आहे. याचा फायदा घेऊन साठेबाजांकडून कृत्रिम टंचाई करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला असून तालुक्यातीलही पुरवठा विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहे त्यानुसार राळेगाव पुरवठा विभागाने दि. ३० मार्च २०२६ रोजी तालुक्यातील सावनेर येथील एका किराणा दुकानात पुरवठा विभागाच्या पथकाने धाड टाकून किराणा दुकानातून १३ घरगुती सिलेंडर व २ व्यवसाय सिलेंडर तसेच १५ लिटर पेट्रोल जप्त करून पंचसमक्ष पंचनामा करत याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून सदर घटनेचा अहवाल पुढील तपासणी करिता वरिष्ठाकडे सादर करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील, पुरवठा निरीक्षक संघप्रिय भवरे, कनिष्ठ लिपिक अमोल मंगाम यांच्या पथकाने केली आहे.
या केलेल्या कारवाईने तालुक्यातील अवैध सिलेंडर विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
