
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
गोवंशाची निर्दयतेने आणि अवैधपणे वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी बुधवारी (ता.८) रंगेहात पकडली. या कारवाईत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई राळेगाव ते मेटीखेडा मार्गावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव ते मेटीखेडा रोडने दोन वाहनांतून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून एम.एच. ०५ बी.एच. ७३२७ (टाटा एस) आणि एम.एच. ४० एन. १४३९ (बोलेरो पिकअप) ही दोन वाहने थांबवून त्यांची झडती घेतली. यावेळी वाहनांच्या डाल्यामध्ये ५ गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयतेने, चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना बांधलेली आढळली. पोलिसांनी जनावरांसह दोन्ही वाहने जप्त केली असून, आरोपी आकाश साखरकर (वय ३०) आणि प्रफुल महाकाळकर (वय १९, दोन्ही रा. अल्लीपूर, जि. वर्धा) यांच्यावर प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा आणि महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेली जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
